मंडलाधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहायकाचा समावेश
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर, महसूल विभागातील मंडलाधिकारी, अव्वल कारकून आणि महसूल सहायक आदी 128 कर्मचार्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय तलाठी संवर्गातील 30 जणांना मंडलाधिकारीपदी बढती देण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी या बदल्यांचे आदेश काढले. बदली झालेल्या कर्मचार्यांना तत्काळ आपापल्या पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महसूल प्रशासनातील या बदल्यांकडे कर्मचार्यांचे गेल्या आठ दिवसापासून लक्ष लागले होते. अनेकांना आपल्या आवडीप्रमाणे व सोयीच्या ठिकाणी बदली होईल, अशी अपेक्षा धरली होती. परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. काही कर्मचार्यांनी या बदलीविरोधात मॅटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मंडलाधिकारी 27, अव्वल कारकून 43 आणि महसूल सहायक 58 अशा एकूण 128 कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नियमानुसार तीन व पाच वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचार्यांच्याच बदल्या करण्यात आल्या आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी सांगितले. यात एकाचीही विनंती बदली नाही, हे विशेष.