प्रतिनिधी / मडगाव
मडगावातील न्यू मार्केट आणि गांधी मार्केट या बाजारपेठा सोशल डिस्टन्सिंग शक्मय नसल्याच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे सुपर स्टोअर्स आणि बागायतदारसारखी दुकाने खुली ठेवण्यात आली असली, तरी अशा ठिकाणी गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे. पालिका आणि पोलिसांकडून अशा गर्दी होणाऱया ठिकाणी कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते.
न्यू मार्केटनजीकच पिकअप स्थानकाच्या जवळ असलेल्या बोरकर सुपर मार्केटमध्ये अलीकडे गर्दी होत असल्याचे दिसून येते. येथे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. हे दुकान आधीच चिंचोळे असून दोन ग्राहकांना फिरण्यास आत वाट नसते. त्यातच या सुपर स्टोअरचा कर्मचारी वर्ग 15 पेक्षा जास्त असून त्यामुळे येथे कोविडचा संसर्ग होण्याची भीती जास्त असल्याचे काही व्यापारी सांगताना आढळतात.
बुधवारी या सुपर मार्केटमध्ये गर्दी होत असल्याची तक्रार पोलीस व पालिकेकडे आल्याने पोलीस व पालिकेच्या मार्केट निरीक्षकांनी पाहणी केल्याचे सांगण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचा नियम योग्य प्रकारे पाळला न गेल्यास दुकान बंद करण्यास भाग पाडले जाईल अशी तंबी यावेळी व्यवस्थापनाला देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारे नावेली, आर्ले येथील बागायतदार व अन्य सुपर मार्केटमध्ये गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडत असताना पोलीस वा पालिका, पंचायत यासारख्या स्थानिक स्वराज संस्था कारवाई का करत नाहीत असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.