देवगडला लिलाव सेंटरवर चोख पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी / देवगड:
मासेमारी व्यवसाय सुरळीतपणे सुरू व्हावा, यासाठी विभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या सूचनांनुसार सोमवारी सायंकाळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळून मासळी लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मासळी लिलाव करण्यास शासनाने बंदी घातली होती. मासळी लिलाव होत नसल्याने मच्छीमारांच्या मासळीला दर मिळत नव्हता. त्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे मच्छीमारांनी केलेल्या मागणीनुसार विभागीय पोलीस अधिकाऱयांनी शनिवारी देवगड येथे देऊन लिलावासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी सोमवारी सायंकाळी नगर पंचायतीने आखणी करून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगनुसार मासळी लिलाव प्रक्रियेला सुरुवात करून दिली. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मच्छीमार, मासळी विक्रेते यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून मासळी लिलावाला सुरुवात केली. यावेळी मत्स्य परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, तारामुंबरी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष विनायक प्रभू, मच्छीमार नेते भाई खोबरेकर, सचिन कदम, ज्ञानेश्वर खवळे, सागर सुरक्षा रक्षक धाकोजी खवळे, संदेश चोपडेकर उपस्थित होते. दोन मच्छीमार संस्था आणि खासगी एजंटांमार्फत लिलाव सेंटर येथे चार ठिकाणी लिलाव प्रक्रिया सुरू होती. यावेळी मासळी विक्री करणाऱया महिलाही उपस्थित होत्या.