नवी दिल्ली
भारताची अव्वल मानांकित महिला स्क्वॅशपटू ज्योश्ना चिन्नाप्पा नजीकच्या काळात स्क्वॅश कोर्टवरील प्रवेशासाठी आतुरलेली आहे. कोरोना महामारी संकटामुळे चिन्नाप्पाला जवळपास पाच महिने स्क्वॅशपासून अलिप्त रहावे लागले आहे.
देशातील कोरोना परिस्थिती अधिक चिंताजनक होत असल्याने येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण देशात कोणत्याही क्रीडा हालचाली होणार नाहीत, असे राष्ट्रीय क्रीडा मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. संपूर्ण देशामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच कोणत्याही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत विचार केला जाईल. पण सप्टेंबरपूर्वी कोणत्याही क्रीडा हालचाली होणार नसल्याचे अखिल भारतीय स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सचिव आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक सायरस पोंचा यांनी स्पष्ट केले आहे. चेन्नईतील भारतीय स्क्वॅश अकादमीमध्ये स्क्वॅशचे प्रशिक्षण सराव सुरू करण्याची शक्यता अंधूक असल्याचे दिसून येते. 5 महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतीय स्क्वॅश अकादमीच्या केंद्रामध्ये स्क्वॅशचा सराव करण्यासाठी आपण आतुरलेली आहे, असे चिन्नाप्पाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
2022 च्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पूर्वतयारी करण्याची गरज असून कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करत दिवसातून किमान एक तास सराव करण्यासाठी आपल्याला लवकरच परवानगी मिळेल, अशी आशा चिन्नाप्पाने व्यक्त केली आहे. 2016 साली चिन्नाप्पाने पहिल्यांदाच जगातील पहिल्या दहा स्क्Ÿशपटूमध्ये स्थान मिळविले आहे. गेल्या महिन्यात टॉपसिडेड स्क्वॅशपटू रेनीम विलीली अनपेक्षीतरित्या निवृत्त झाल्याने आपल्याला मानांकनातील वरचे स्थान मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. खडतर परिश्रम आणि सराव केला तरी नशिबाची साथ जरूरीची असते. स्क्वॅश कोर्टवर दर्जेदार स्क्वॅशपटू असल्याचे मला सिद्ध करावे लागणार असल्याचे 33 वर्षीय चिन्नाप्पाने म्हटले आहे. मार्चनंतर जवळपास चार महिन्याच्या कालावधीत शारीरिक तंदुरूस्ती राखण्यावर मी अधिक भर दिल्याचे तिने सांगितले.