ऑक्सफोर्ड विद्यापीठातही चांगले गुण मिळविण्याचा दबाव
ब्रिटनच्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये चांगले गुण मिळविण्याचा मोठा दबाव असतो, ऑक्सफोर्ड एडिनबर्ग, नॉटिंघम आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थी सध्या स्टडी ड्रग्सचे सेवन करून परीक्षा देत आहेत. स्टडी ड्रग झोप पळविणारे औषध असते. त्यांचे सेवन करून विद्यार्थी अनेक तास अभ्यास करू शकतात, त्यांना झोप येत नाही आणि त्यांना ताजेतवाने वाटत राहते. पण या औषधांचे घातक दुष्परिणाम देखील आहेत.
स्टडी ड्रग्स नावाच्या औषधांच्या विक्रीवर कुठलीच बंदी नाही. ब्रिटनमध्ये विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय एका ब्रँडचे स्टडी ड्रग कुठल्याही औषधाच्या दुकानावर सहजपणे 200 रुपयांमध्ये उपलब्ध होते. दीर्घकाळापर्यंत या औषधांचे सेवन केल्यावर दुष्परिणाम समोर येतात. ब्रिटिश विद्यापीठांमध्ये झालेल्या सर्वेक्षणात सुमारे 20 टक्के विद्यार्थी या औषधांचे सेवन करून परीक्षा देत असल्याचे समोर आले आहे.
काही विद्यार्थी स्वतःला आजारी ठरवून डॉक्टरांकडून ही स्टडी ड्रग्स मिळवितात किंवा ती खरेदी करून अन्य विद्यार्थ्यांना पुरवतात. विद्यार्थी या स्टडी ड्रग्सना ऑनलाईन स्टोअर्समधून मोठय़ा प्रमाणात मागवून घेतात. ब्रिटनसह युरोपच्या अन्य देशांमध्ये औषधांच्या ऑनलाईन ऑर्डरवर डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन मागितले जात नसल्याची माहिती ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक एंडर्स सँडबर्ग यांनी दिली. वाचनालयातही विद्यार्थी या औषधांची देवाणघेवाण करत असून ही अत्यंत धोकादायक स्थिती असल्याचे कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या प्राध्यापिका बार्बरा यांचे म्हणणे आहे.
वापर गैर ठरविण्यात यावा
स्टडी ड्रग्सचे सेवन करून परीक्षा देण्याला गैर साधनांचा वापर मानण्यात यावे असे ब्रिटनमधील कुलपतींची संघटना युनिव्हर्सिटीज युकेचे म्हणणे आहे. पुढील वर्षापासून विद्यापीठ परिसरात स्टडी ड्रग्सच्या वापरावर बंदीसाठी विस्तृत दिशानिर्देश लागू केले जातील असे सांगण्यात आले.