वृत्तसंस्था /दुबई :
आयसीसीच्या कसोटी क्रिकेट अष्टपैलूंच्या मानांकनात इंग्लंडच्या बेन स्टोक्सने अग्रस्थान मिळविताना विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला मागे टाकले आहे तसेच कसोटी फलंदाजांच्या मानांकनात स्टोक्सने तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे.
आयसीसीतर्फे कसोटी क्रिकेटमधील ताजी मानांकन यादी जाहीर करण्यात आली. सोमवारी संपलेल्या दुसऱया कसोटीत विंडीजविरूद्ध खेळताना बेन स्टोक्सने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला या मालिकेत बरोबरी साधून दिली. आयसीसीच्या ताज्या कसोटी अष्टपैलूंच्या मानांकन यादीत स्टोक्स पहिल्या स्थानावर असून विंडीजचा कर्णधार होल्डर 38 मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. दुसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी स्टोक्स होल्डरपेक्षा 54 मानांकन गुणांनी मागे होता. विंडीजविरूद्धच्या दुसऱया कसोटीत बेन स्टोक्सने पहिल्या डावात 176 तर दुसऱया डावात नाबाद 78 धावांची खेळी केली. तसेच त्याने गोलंदाजीत 3 गडी बाद केले. या कामगिरीमुळे इंग्लंडने ही दुसरी कसोटी 113 धावांनी जिंकून विंडीजशी 1-1 बरोबरी साधली आहे. आता शुक्रवारपासून सुरू होणारी या मालिकेतील तिसरी कसोटी निर्णायक ठरणार आहे.
विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने कसोटी अष्टपैलूंच्या मानांकनातील अग्रस्थान तब्बल दीड वर्षे स्वत:कडे राखले होते. 2006 च्या मे महिन्यात इंग्लंडच्या ऍड्रय़ू फ्लिनटॉफने आयसीसीच्या कसोटी अष्टपैलू मानांकनात अग्रस्थान पटकाविले होते. स्टोक्स आता ताज्या कसोटी मानांकनात 497 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या मानांकनात भारताचा रविंद्र जडेजा तिसऱया, ऑस्ट्रेलियाचा स्टार्क चौथ्या, भारताचा रविचंद्रन अश्विन पाचव्या स्थानावर आहे.
ताज्या कसोटी फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पहिल्या, भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱया तर इंग्लंडचा स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा लाबुशेन संयुक्त तिसऱया स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विलीयमसन चौथ्या, पाकचा बाबर आझम पाचव्या स्थानावर आहेत. इंग्लंडचा कर्णधायर रूट नवव्या स्थानावर असून चेतेश्व़र पुजारा आठव्या आणि अजिंक्य रहाणे दहाव्या स्थानावर आहेत.
कसोटी गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडच्या ब्रॉडने पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये स्थान मिळविले आहे. विंडीजविरूद्धच्या दुसऱया कसोटीत ब्रॉडने सहा गडी बाद केले होते. या यादीत ब्रॉड दहाव्या स्थानावर असून अँडरसन 11 व्या स्थानावर आहे. विंडीजचा होल्डर तिसऱया स्थानावर आहे. आयसीसीच्या सांघिक कसोटी मानांकनात भारत 360 गुणांसह पहिल्या, ऑस्ट्रेलिया 296 गुणांसह दुसऱया तर इंग्लंड 186 गुणांसह तिसऱया, न्यूझीलंड 180 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.