दुचाकी चोरटे जेरबंद, अडीच लाखाच्या चार दुचाकी हस्तगत
प्रतिनिधी/ सातारा
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून फरार असलेल्या संशयिताला जेरबंद केले आहे. तसेच दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. दुचाकी चोरीच्या गुह्यातील 2 लाख 50 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आला आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेली माहिती अशी, जिह्यातील गुह्यातून फरार असलेल्या संशयितांना जेरबंद करण्यासह दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना केल्या होत्या. किशोर धुमाळ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली पथक स्थापन करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने तपास करत असताना पथकाला दि. 17 रोजी रहिमतपुर (ता. कोरेगाव) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुह्यातील फरारी संशयीत वडुज (ता. खटाव) येथील इंदिरानगर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी त्याला रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली.
आणखी एका घटनेत मुंबई, पुणे येथून चोरी केलेल्या दुचाकी दोन संशयित ग्रामीण भागात विकत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीनुसार पथकाने उत्तर तांबवे (ता. कराड) येथे सापळा लावून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी चोरीच्या गुह्यातील 2 लाख 50 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पोलीस हवालदार अतिश घाडगे, पोलीस नाईक साबीर मुल्ला, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश महाडिक, अमोल माने सहभागी झाले.