नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एक मोठा अनर्थ सुदैवाने टळला. सकाळच्या सुमारास दिल्लीहून श्रीनगरला जाणारे स्पाईसजेट कंपनीचे प्रवासी विमान उड्डाण घेण्यापूर्वी विजेच्या खांबाला धडकले. विमानाचा एक पंख विमानतळावरील एक भव्य अशा विजेच्या खांबाला धडकला. पण सुदैवाने या घटनेत कोणताच प्रवासी जखमी झाला नाही. या घटनेनंतर काही वेळातच प्रवाशांना दुसऱया विमानाने श्रीनगरला पाठविण्यात आले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. संबंधित विमान हे दिल्लीहून 9 वाजून 20 मिनिटांनी निघणार होते. पण उड्डाण घेत असतानाच विमानाच्या उजव्या पंखाला हानी पोहोचली. एसजी-160 हे विमान उड्डाणापूर्वी पुशबॅक दरम्यान विजेच्या खांबाला धडकल्यामुळे पंखाचे नुकसान झाल्याचे स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.