कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली : जगभरात आतापर्यंत 57,07,777 जणांना संसर्ग
जगात आतापर्यंत 57 लाख 07 हजार 777 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 24 लाख 49 हजार 556 बाधितांनी कोरोनावर मात करण्यास यश मिळविले आहे. महामारीमुळे आतापर्यंत 3 लाख 52 हजार 746 जणांना जीव गमवावा लागला आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे जीव गमाविलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारपासून 10 दिवसांचा दुखवटा पाळला जात आहे. या कालावधीत देशभरातील 14,000 पेक्षा अधिक शासकीय इमारती, नौदलाच्या 140 नौका आणि विदेशातील स्पेनच्या दूतावासांच्या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर आणला जाणार आहे.
स्पेनमध्ये 27,117 बळी
स्पेनमध्ये कोरोना महामारीमुळे 27,117 जणांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. मृत्युमुखी पडलेले 10 पैकी 8 जण हे 70 वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते. स्पेनसाठी आयुष्य वेचलेले हे लोक होते, असे उद्गार सरकारचे प्रवक्ते आणि अर्थमंत्री मारिया यीशु मोंटरो यांनी काढले आहेत. स्पेनमध्ये आता संसर्ग घटू लागल्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. स्पेनने पुढील काळात विदेशी पर्यटकांना प्रवेशाची अनुमती देण्याची तयारी चालविली आहे. स्पेनची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. सरकारने जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
उपाध्यक्षांच्या सचिव पुन्हा रुजू
अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी प्रसारमाध्यम सचिव कॅटी मिलर कामावर परतल्याची माहिती दिली आहे. केटी मिलर 14 दिवसांपेक्षा अधिक काळ विलगीकरणात होत्या. व्हाइट हाउसने 8 मे रोजी केटी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली हाती. अमेरिकेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मंगळवारी रात्री 1 लाखापेक्षा अधिक झाली आहे. अमेरिकेत दिवसभरात सुमारे 700 जण कोरोनामुळे दगावले आहेत. तर 24 तासांत 19 हजारांपेक्षा अधिक नवे बाधित सापडले आहेत.
ब्रिटन : दिवसात 134 बळी
ब्रिटनमध्ये मागील 24 तासांत 134 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर देशातील एकूण बळींचा आकडा 37,048 झाला आहे. तर एकूण बाधितांचे प्रमाण 2,65,227 वर पोहोचले आहे. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सने ब्रिटन आणि वेल्समध्ये कोरोना संसर्गाशी संबंधित 42,173 मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या संख्येत महामारीशी संबंधित संशयास्पद प्रकरणेही सामील आहेत.
रशिया : एससीओ परिषद स्थगित
रशियाने शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) शिखर परिषद स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. एससीओ परिषद 22 आणि 23 जुलै रोजी सेंट पीटसबर्ग येथे आयोजित होणार होती. राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी ही परिषद स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परिषद महामारीमुळे लांबणीवर पडल्याचे अधिकाऱयाने सांगितले आहे. परंतु परिषद स्थगित करण्याचा निर्णय पूर्णपणे निर्धारित करण्यात आलेला
नाही.
पोलंडमध्ये 21,687 बाधित
पोलंडमध्ये मागील 24 तासांमध्ये 236 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील बाधितांचा एकूण आकडा 21 हजार 867 झाला आहे. तर संसर्गामुळे आतापर्यंत 1,013 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु पोलंडमध्ये सोमवारपासून एकाही रुग्णाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेला नाही.
62 हजार आरोग्य कर्मचारी बाधित
अमेरिकेत सुमारे 62 हजार 344 आरोग्य कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली असून 291 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) दिली आहे. प्रत्यक्षात हा आकडा याहूनही अधिक असू शकतो. तर अमेरिकेत कोरोना बळींची संख्या 1,00,625 वर पोहोचली आहे. ही संख्या जगातील कुठल्याही देशापेक्षा अधिक आहे.
फ्रान्स : 28,530 बळी
युरोपीय देश फ्रान्समध्ये आतापर्यंत 28 हजार 530 जणांचा जीव गेला आहे. फ्रान्समध्ये प्रतिदिन मृतांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ रुग्णालयांमध्येच 18,195 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 10,335 रुग्णांचा मृत्यू घरी किंवा अन्य ठिकाणी झाला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 1,82,722 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
जर्मनीत सोशल डिस्टन्सिंगवर भर
जर्मनीत कोरोना महामारीला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा नियम 29 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कमाल 10 लोकांनाच एकत्र येता येणार आहे. जर्मनीत 1,81,288 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 8,498 जणांना जीव गमवावा लागला आहे. जर्मनीने आता निर्बंध शिथिल करत आर्थिक व्यवहार पूर्वपदावर आणण्यास प्रारंभ केला आहे.
जपान : दुसऱया लाटेचा धोका
जपानला संसर्गाच्या दुसऱया लाटेला सामोरे जावे लागू शकते. नवी रुग्णसंख्या पाहता आम्ही दुसऱया लाटेच्या उंबरठय़ावर आहोत, असे उद्गार किताकुशुचे महापौर केनजी कीताशी यांनी काढले आहेत. किताकुशु शहरात सुमारे 9 लाख 37 हजार लोकांचे वास्तव्य आहे. तेथे 23 दिवसांमध्ये नवा रुग्ण सापडला नव्हता. परंतु मागील आठवडय़ात 14 नवे बाधित आढळून आले आहेत.