महामारीचा प्रकोप वर्षभर राहणार
जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या चीफ ऑफ स्टाफने एका रेडिओ स्थानकाशी बोलताना आम्ही महामारीनंतरच्या स्थितीत पोहोचले नसल्याचे सांगितले आहे. आपण सर्व महामारीदरम्यान जगत आहोत. ही स्थिती आता किमान पूर्ण वर्ष राहणार असल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी मर्केल यांनी कोरोना संकटामुळे लागू निर्बंधांमध्ये दिलासा देण्याचे संकेत दिले होते.
एप्रिलमध्ये प्रतिदिन 80 हजार रुग्ण
एप्रिलमध्ये प्रतिदिन सरासरी 80 हजार बाधित सापडल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. भारत आणि बांगलादेश यासारख्या दक्षिण आशियाई देशांमध्ये संसर्गाला वेग दिसून येत आहे. तर पश्चिम युरोपीय देशांमध्ये संसर्ग घटू लागला आहे. तर या कालावधीत पूर्व युरोपीय देश, आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया आणि अमेरिकेत तुलनेत अधिक रुग्ण सापडले आहेत.
न्यूयॉर्कमधील संकट कायम
अमेरिकेत मागील 24 तासांत 2,073 जणांचा बळी गेला असून 25 हजार 459 रुग्ण सापडले आहेत. तेथील मृतांचा आकडा 74,809 वर पोहोचला आहे. तर 12 लाख 63 हजार 243 जण बाधित आहेत. न्यूयॉर्क प्रांतात एका दिवसात 232 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु आता येथील संसर्ग आणि बळींच्या आकडय़ात घट होत असल्याचे उद्गार गव्हर्नर ऍन्ड्रय़ू क्यूमो यांनी काढले आहेत.
कोरोना सर्वात विध्वंसक हल्ला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना संसर्गाची तुलना पर्ल हार्बरवर झालेल्या हल्ल्याशी केली आहे. हा आतापर्यंतचा देशावरील सर्वात विध्वंसक हल्ला आहे. चीनने वेळीच पावले उचलली असती तर ही महामारी जगभरात पसरली नसती असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी व्हाइट हाउस टास्क फोर्स संपुष्टात आणणार नसल्याची घोषणा केली आहे.
स्पेन सतर्कतेच्या भूमिकेत
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या सरकारने 24 मेपर्यंत देशातील आणीबाणी वाढविली आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने निर्बंधांमध्ये सूट दिली होती. देशातील मुलांना घराबाहेर खेळण्याची अनुमती देण्यात आली होती. स्पेनमध्ये आतापर्यंत 2,56,855 बाधित सापडले असून 26,070 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये मागील काही दिवसांपासून संसर्गात घट झाल्याचे दिसून येत आहे.
ब्रिटनमध्ये 2 लाखांहून अधिक रुग्ण
ब्रिटनमध्ये दिवसात 649 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 5 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांची संख्या 2,01,101 झाली आहे. याचबरोबर देशात 30,076 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. देशात सोमवारपासून निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू होणे वेदनादायक असल्याचे उद्गार पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काढले आहेत.
इटलीत बळींची संख्या घटतेय
इटलीत मागील 24 तासांत 369 जणांचा मृत्यू झाला आहे. नागरी सुरक्षा विभागानुसार देशातील बाधितांची संख्या 2 लाख 14 हजार 457 झाली आहे. युरोपमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक ग्रस्त देशांमध्ये इटली सामील आहे. इटलीतील कोरोना संसर्ग आता घटू लागला आहे. तेथील नवी रुग्णसंख्या तसेच बळींचा आकडा आता कमी होताना दिसून येतोय.
दक्षिण कोरियात 10,810 रुग्ण
दक्षिण कोरियात दिवसभरात 4 नवे रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत 10 हजार 810 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 24 तासांत महामारीमुळे केवळ एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. दक्षिण कोरियातील मृतांची संख्या 256 झाली आहे. संसर्गाच्या फैलावात मोठी घट झाल्याने प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमध्ये काही प्रमाणात सूट देण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेने महामारीवर लक्ष द्यावे
अमेरिकेतील चिनी राजदूत सुई तीआंकी यांनी अमेरिकेच्या प्रशासनाला आरोप-प्रत्यारोपाचा खेळ बंद करून महामारीला तोंड देण्याचा सल्ला दिला आहे. चीनवर आरोप लावणे योग्य ठरणार नाही. अशा कृतीतून केवळ महामारीच्या विरोधातील लढा कमजोर होणार आहे. चीनला सदैव लक्ष्य करण्याचा प्रकार हा गलिच्छ राजकारणाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.