प्राणिसंग्रहालयात फैलावला संसर्ग
कोरोना विषाणू माणसांसह प्राण्यांनाही सातत्याने त्रास देऊ लागला आहे. स्पेनच्या बार्सिलोना शहरातील एका प्राणिसंग्रहालयात 4 सिंह कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याचबरोबर प्राणिसंग्रहालयाचे दोन कर्मचारीही बाधित झाले आहेत.
जाला, नीमा आणि रन रन नावाच्या तीन सिंहिणींमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली होती. तर कियुंबे नावाच्या सिंहामध्येही ही लक्षणे दिसून आली. या चारही जणांची चाचणी करविण्यात आली असता सर्व सिंह कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सिंहांना कोरोनाची लागण कशामुळे झाली याचा शोध आता प्राणिसंग्रहालय व्यवस्थापन घेत आहे.
प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱयांनी या चारही सिंहांची पीसीआर स्वॅब चाचणी केली होती. हे सिंह एखाद्या लक्षणरहित बाधिताच्या संपर्कात आले असावेत, असे मानले जात आहे. या सर्व सिंहांना अँटीइन्फ्लेमेटरी औषधे दिली जात असून त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. सर्वसामान्य फ्ल्यूप्रमाणेच सौम्य लक्षणे असल्याने या सिंहांची देखभाल केली जात आहे. हे सिंह देखील या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाबाधित सिंहांकडून प्राणिसंग्रहालयात येणाऱया लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका अत्यंत कमी आहे. सिंह पाहण्यास येणारे लोक त्यांच्या अत्यंत नजीक जात नसल्याचे प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आले आहे.