अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष बायडेन यांचा दावा
स्वतःच्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये मास्क परिधान करणे अनिवार्य करणार आहे. तसेच 10 कोटी लोकांना लस मिळणार असून बहुतांश शाळा पुन्हा सुरू करण्यात येतील असे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. तज्ञांचे पथक उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करविणार असून अर्थव्यवस्थेत नवा प्राण ओतणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
फायजर आणि मॉडर्नासोबत चर्चेनंतर त्यांचे डोस खरेदी करणे आणि जगभरासाठी लसींचे उत्पादन वाढविण्यावर वेगाने काम करणार आहे. माझे पथक कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये किमान 10 कोटी लोकांचे लसीकरण करविणार आहे. याचबरोबर मुलांना पुन्हा शाळेत पाठविण्यास राष्ट्रीय प्राधान्य असणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱयांच्या सुरक्षेसाठी आवश्यक निधी काँग्रेसने पुरविल्यास बहुतांश शाळा पुन्हा सुरू होतील, असे उद्गार त्यांनी काढले आहेत. मास्क अनिवार्य करणे, लसीकरण आणि शाळा पुन्हा सुरू करणे ही तीन महत्त्वपूर्ण लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. बायडेन यांनी जेवियर बेसेरा यांना आरोग्य तसेच मानवी सेवा मंत्री, भारतीय वंशाचे डॉ. विवेक मूर्ती यांना सर्जन जनरल, डॉ. अँथनी फौसी यांना कोविड-19 विषयक प्रमुख सल्लागार, डॉ. रोचेल वालेंस्की यांना सीडीसी संचालक तर डॉ. मार्सेला नुनेज स्मिथ यांना कोविड-19 इक्विटी टास्क फोर्सच्या अध्यक्षा म्हणून निवडले आहे.