प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांचा विकास करून नवीन फुटपाथ उभारण्यात येत आहे. मात्र फुटपाथवर येणारी अतिक्रमणे हटविण्याकडे स्मार्ट सिटी आणि महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. एपीएमसी रोड येथील फुटपाथचे काम पूर्ण झाले. मात्र फुटपाथवरील ट्रान्सफॉर्मर आणि खासगी जाहिरात फलक हटविण्यात आले नाहीत. त्यामुळे फुटपाथवरून पादचाऱयांनी जायचे कसे असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराचा विकास करण्यात येत आहे. ठिकठिकाणी असलेल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ निर्माण करण्यात येत आहे. सध्या विविध रस्त्यांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. काही रस्त्यांचे काम अर्धवट स्थितीत आहे. रस्त्याचे काम पूर्ण करून पादचाऱयांसाठी फुटपाथ बांधण्यात आले आहे पण फुटपाथवरील अतिक्रमणे आणि विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर हटविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. एपीएमसी रोडच्या दुतर्फा गटारीचे बांधकाम पूर्ण करून फुटपाथ निर्माण करण्यात आले आहे. पण फुटपाथवरील विद्युत ट्रान्सफॉर्मर स्थलांतर करण्यात आले नाही. त्यामुळे सदर विद्युत ट्रान्सफॉर्मर फुटपाथवर आडवे आहे. त्यामुळे परिसरातील व्यवसायिकांनी फुटपाथवरील जाहिरात फलक देखील हटविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच ट्रान्सफॉर्मर ते जाहिरात फलकाच्या परिसरातील फुटपाथवर विविध साहित्य ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे फुटपाथचा दुरूपयोग होत आहे. सदर फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने यावरून पादचाऱयांनी ये-जा कशी करायची असा मुद्दा उपस्थित झाला आहे. फुटपाथ निर्माण करताना फुटपाथवर येणारी अतिक्रमणे हटवुन विद्युत खांब आणि विद्युत ट्रान्सफॉर्मर हटविण्याची आवश्यकता आहे. हे काम कोण करणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे. याकडे स्मार्ट सिटी आणि महापालिकेचे अधिकारी लक्ष देतील का? अशी विचारणा होत आहे.