प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसराच्या स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत नवीन वाहने खरेदी करण्यात आली आहेत. जेटींग मशीन, डेनेज चेंबर, स्वच्छतेसाठी आवश्यक असलेली यंत्रोपकरणे कॅन्टोन्मेंटच्या वाहन ताफ्यात दाखल झाली आहेत. या वाहनांचे पूजन कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कॅन्टोन्मेंट बोर्डने चार नवीन वाहने खरेदी केली असून, पाण्याचा टँकर आणि घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यासाठी कचरा वाहतूक गाडी, जेटींग मशीन अशा वाहनांचा समावेश आहे. सदर वाहनांचा वापर करण्यासाठी लोकार्पण करण्यात आले. कॅन्टोन्मेंट बोर्डची बैठक झाल्यानंतर या वाहनांची पूजा करण्यात आली.
आर. ए. लाईन परिसरात दुर्गादेवी मंदिर आहे. दसरोत्सवात मोठय़ा प्रमाणात महाप्रसाद आयोजित केला जातो. दसऱयादिवशी मूर्तीची मिरवणूक काढली जाते. पण मिलिट्रीने तारेचे कुंपण घातले असल्याने मिरवणूक काढण्यास अडचण निर्माण झाली आहे. भाविकांना ये-जा करण्यास रस्ता सोडणे आवश्यक आहे. त्याकरिता लष्कराने सहकार्य करावे, अशी सूचना आमदार अनिल बेनके तसेच नागरिकांनी केली. विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी विनंती करण्यात आली. हा रस्ता खुला करण्यात येणार नसून भाविकांनी गणपती मंदिराशेजारील रस्त्याचा वापर करावा. त्याच मार्गाने देवीची मिरवणूक काढण्याची सूचना ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी केली. त्या रस्त्याने कोणीही अडवणूक करणार नाही, असे सांगितले.