वार्ताहर/ रहिमतपूर
केंद्र शासनाकडून देशभरात स्वच्छ सर्वेक्षण लीग 2020 त्रैमासिक सत्रामध्ये घेण्यात आले आहे. नुकतेच पहिल्या व दुस्रया सत्राचा निकाल जाहीर झाला असून पहिल्या सत्रामध्ये कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषदेने दहावा व दुस्रया सत्रामध्ये सातवा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे रहिमतपूर शहरात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण लीगमधील पहिले सत्र सन 2019 मधील एप्रिल ते जून, दुसरे सत्र जुलै ते सप्टेंबर व तिसरे सत्र ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत घेण्यात आले होते. यातील पहिल्या व दुसऱया सत्राचा निकाल केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम भारतामध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात रहिमतपूर नगरपरिषदेने अनुक्रमे दहावा व सातवा क्रमांक पटकावला आहे. याबाबतच्या मूल्यांकन हे स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्त संस्थेद्वारे करण्यात आले आहे. रहिमतपूर पालिकेने सन 2019-20 मध्ये हागणदारीमुक्त शहर, ओडीएफ प्लस दर्जा आणि कचरामुक्त शहर जीएफसी थ्री स्टार मानांकन प्राप्त केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत होणारी शहराची स्वच्छतेबाबत प्रत्यक्ष पाहणी दि.4 जानेवारी ते 30 जानेवारी 2020 या कालावधीत होणार आहे. यामध्ये शहरातील रहिवाशी क्षेत्र, एसटी स्टॅंड, भाजी मंडई परिसरातील कचरा संकलन, वर्गीकरण, रस्ते साफसफाई स्वच्छता तसेच सामुदायिक व सार्वजनिक शौचालय स्वच्छता, शहरातील सुशोभिकरण, स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती होर्डिंग, प्लास्टिक बंदी, वॉटर बॉडी, नदी – नाले स्वच्छता, बांधकाम, राडारोडा व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन केंद्र याबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.
स्वच्छतेमध्ये रहिमतपूरची घोडदौड
रहिमतपूर शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी सातत्याने शहरवासियांची धडपड सुरू आहे. या मोहिमेत नगरपालिका पदाधिकारी व कर्मचारी शहरवासियांच्या खांद्याला खांदा लावून ताकदीने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत उतरले आहेत. ग्रामस्थ, पालिका पदाधिकारी व कर्मचारी एकसंघपणे करत असलेल्या कामाचे चीज रहिमतपूर नगरपरिषदेला देशात सातवा क्रमांक मिळाल्याने झाले आहे. मात्र आम्ही देशात प्रथम क्रमांक मिळावा, यासाठी ताकतीने स्वच्छ मोहिमेत उतरलो असल्याचा इरादा रहिमतपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी स्पष्ट केल.