प्रतिनिधी / बेळगाव
स्वरमल्हार बेळगावतर्फे संवादिनी महर्षि पं. रामभाऊ विजापुरे जयंतीनिमित्त गुरुवार दि. 7 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता संगीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम बुधवारपेठ, टिळकवाडी येथे होणार असून बैठकीत अनय घाटे, गोवा (सोलो संवादिनी वादन) संतोष पुरी (सोलो तबला वादन) योगेश रामदास (शास्त्रीय गायन) हे कलाकार उपस्थित राहणार आहेत. सर्व कलाकारांना दीपक मराठे (लेहरा) आणि शशांक उपाध्ये (तबला) संगत करणार आहेत. याप्रसंगी सभागृहाच्या नाम फलकाचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कलाकारांचा परिचय पुढीलप्रमाणे…
अनय देविदास घाटे
हार्मोनियम वादनाचे शिक्षण, प्राथमिक शिक्षण-किशोर पालकर यांच्याकडे झाले. नंतरचे शिक्षण पं. तुलसीदास बोरकर गुरुजी यांच्याकडे झाले आणि सध्याचे शिक्षण पं. डॉ. सुधांशू कुलकर्णी यांच्याकडे सुरू आहे. तसेच अनय याने यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवीही संपादन केली आहे. कला आणि संस्कृती या स्पर्धेत दोनवेळा राज्य पातळीवर क्रमांक पटकावला आहे. तसेच याच स्पर्धेत एकदा दुसरा क्रमांक पटकावला आहे.
आकाशवाणी संगीत स्पर्धेत समूह गायनात राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक (हार्मोनियम साथसंगत) आणि त्यासाठी आकाशवाणी रत्नागिरीची ‘ब’ श्रेणी मिळाली आहे. पं. राम मराठे स्मृती संगीत स्पर्धेत ‘संगीत भूषण’ पुरस्काराने सन्मानित.
शशांक उपाध्ये
यांनी प्राथमिक शिक्षण रामदास नाईक यांच्याकडे घेतले आहे. पुढील शिक्षण पं. उल्हास वेलिंगकर यांच्याकडे गेली 4 वर्षे चालू आहे. अनेक शास्त्रीय व उपशास्त्रीय कार्यक्रमांमध्ये तबला साथ. स्वरवर्षाव 2019, पं. तुळशीदास बोरकर स्मृती समारोह, नंददीप महोत्सव अशा शास्त्रीय संमेलनामध्ये सहभाग. ते विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत.
संतोष पुरी
तबल्याचे प्राथमिक शिक्षण विश्वनाथ हुदलीकर, पं. बसवराज भेंडीगिरी, कै. हयवदन जोशी आणि विनायक नाईक यांच्याकडून घेतले आहे. हार्मोनियमचे शिक्षण डॉ. सुधांशू कुलकर्णी आणि सतारचे शिक्षण संजय देशपांडे, गायनाचे शिक्षण महेश कुलकर्णी यांच्याकडून घेतले. शास्त्राrय तसेच सुगम संगीतात हातखंडा असलेल्या संतोष यांनी प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, पं. अनंत कलाकारांना तबल्याची साथसंगत केली आहे. सध्या केंद्रीय विद्यालयात संगीत अध्यापनाचे कार्य करीत आहेत.
दीपक मराठे
यांचे संवादिनीचे शिक्षण कै. पं. रामभाऊ विजापुरे यांच्याकडे झाले असून सारंगीचे मार्गदर्शन विख्यात सारंगी वादक पं. रामनारायण यांच्याकडून मिळाले आहे. गायनाचे शिक्षण महेश कुलकर्णी यांच्याकडून घेतले आहे. केंद्र सरकारची सी. सी. आर. टी. शिष्यवृत्ती तसेच बालश्री पुरस्काराने सन्मानित असून देशातील अनेक नामवंत शास्त्रीय संगीत गायक कलाकारांना व गझल गायकांना साथसंगत केली आहे.
योगेश रामदास
हे संगीत अलंकार उत्तीर्ण असून गायनाची तालीम अपर्णा हुनगुंद, प्रसाद शेवडे व पं. रामभाऊ विजापुरे यांच्याकडे घेतली. सध्या डॉ. स्नेहा राजुरीकर यांच्याकडे तालीम घेत आहेत. केएलई हॉस्पिटलमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत आहेत. रसिकजनांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून बैठकीचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.