आप चे वाल्मिकी नाईक यांचे स्थानिक पक्षांना आवाहन
प्रतिनिधी /पणजी
स्वाभिमान असेल तर कोणत्याही स्थानिक पक्षाने भाजपशी युतीसाठी हात पुढे करू नये, किंवा तसा प्रस्ताव पाठवू नये, असे आवाहन आम आदमी पक्षाचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांनी केले आहे. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी नव्यानेच पक्षात प्रवेश केलेले पर्वरीतील रितेश चोडणकर यांचीही उपस्थिती होती.
कालपर्यंत सर्वांना नगण्य समजणारा भाजप आता युतीची भाषा बोलत असून तसे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करत आहे, यावरून त्यांनी खरोखरच पराभवाची धास्ती घेतली असल्याचे सिद्ध होत आहे, असे नाईक म्हणाले. मात्र तेथेही राजकीय चाल खेळताना ते अन्य पक्षांना आपल्या पायाकडे येण्यास सांगत आहेत, हा प्रकार म्हणजे ’पडलो तरी नाक वर’ म्हणण्यासारखाच आहे, अशी खरमरीत टिकाही नाईक यांनी केली आहे.
मोफत देणाऱया पक्षांच्या आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन करणाऱया अमित शहा यांचाही नाईक यांनी समाचार घेतला. टीका करताना आम आदमी पक्षाचे नाव सुद्धा तोंडी घेण्याचे धाडस नसलेला हा राष्ट्रीय नेता ’मोफत घेऊ नका’ असे आवाहन कोणत्या तोंडाने करत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम आदमी पक्षाने दिल्लीत अनेक मोफत योजना सत्यात आणल्यानंतर भाजपने थेट त्यांची कॉपीच केली व अन्य अनेक राज्यात जाऊन स्वतःही अनेक गोष्टी मोफत देण्याची आश्वासने देऊ लागले. खुद्द गोव्यातसुद्धा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 16 हजार लीटर पाणी मोफत देण्याची घोषणा केली. ’आपला तो बाब्या आणि इतरांचा काटर्य़ा’, असाच हा प्रकार असून खरे कोण, खोटे कोण याची शहानिशा आता मतदारांनीच करावी व भाजपला योग्य धडा शिकवावा, असे नाईक म्हणाले.
यावरून एकच गोष्ट सिद्ध होत आहे ती म्हणजे भाजपने आम आदमी पक्षाची धास्ती घेतली आहे. आपला मिळणाऱया प्रतिसादातून मुख्यमंत्री बिथरले आहेत. त्यांच्यातील ’स्वबळ’ जाऊन पक्षाला अशक्तपणा आला असल्यामुळेच अन्य पक्षांच्या कुबडय़ा पुढे जाण्याचा विचार चालविला आहे, अशी जोरदार टीका नाईक यांनी केली आहे.
रितेश चोडणकर आपमध्ये सामील
दरम्यान, पर्वरीतील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते रितेश चोडणकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. लॉकडाऊन काळात पर्वरीतील रहिवाशांना ऑक्सिमीटरसह इतर वैद्यकीय मदत त्यांनी पुरविली होती. कमलाबाई चोडणकर नावाने ते धर्मादाय संस्थाही चालवतात. त्याना शिक्षण, अभियांत्रिकी, दूरसंचार, आतिथ्य, यासारख्या विविध क्षेत्रात 28 वर्षांचा अनुभव आहे.
गोव्यात एकही आमदार नसतानासुद्धा पक्षाने महामारीच्या काळात गोमंतकीयांना विविध प्रकारे केलेली मदत पाहून आपण खूप प्रभावित झाल्याचे नमूद केले. या प्रकारची निस्वार्थी सेवा ही इतर पक्षांमध्ये कमी आहे. गोमंतकीयांवर परिणाम करणाऱया विविध समस्यांवर आम आदमी पक्ष खरोखर काम करत असल्याचेही चोडणकर यांनी नमूद केले.