जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विधान परिषद निवडणूक प्रक्रियेत अडचण नाही : मुख्य निवडणूक अधिकारी
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी नगरपरिषद व नगरपालिकेतील स्विकृत नगरसेवकांनाही मतदानाचा अधिकार राहणार आहे. या निवडणुकीसाठी स्विकृत नगरसेवकांसह मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच विधान परिषद निवडणुकीसाठी मतदारसंघ हा स्थानिक स्वराज संस्थांपुरता मर्यादीत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी येथे व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधान परिषमुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, स्थानिक स्वराज संस्था विधाप परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार काम पाहात आहेत. या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीसाठी मतदारसंघ हा स्थानिक स्वराज संस्थापुरता मर्यादीत आहे. तो विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे मोठा नाही. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या प्रक्रीयेत कोणतीही विशेष अडचण वाटत नाही.
या निवडणुकीसाठी स्विकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार असणार का ? या प्रश्नावर जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, विधान परिषद निवडणुकीसाठी जिह्यातील 416 मतदारांची यादी सोमवारी प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये स्विकृत नगरसेवकांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांनाही या मतदान प्रक्रियेत मतदानाचा अधिकार राहणार आहे. प्रसिध्द झालेल्या मतदार यादीवर दावे व हरकती स्विकारण्या येणर आहेत.