जलतरणपटू-प्रशिक्षकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाबाबतची नियमावली नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पुन्हा स्वीमिंग पूल बंद करावेत, असे म्हटले आहे. मात्र यामुळे जलतरणपटूंचे मोठे नुकसान होत असून आम्ही सर्व ती काळजी घेऊ, मात्र स्वीमिंग पूल खुले करावेत, अशी मागणी जलतरणपटूंनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
स्वीमिंग पूल बंद ठेवल्यामुळे जलतरणपटूंना त्याचा मोठा फटका बसत आहे. कारण कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सराव होणे महत्त्वाचे आहे. जलतरणपटूंना तर दररोज सराव हवा असतोच. मात्र गेल्या वर्षभरामध्ये जलतरणपटूंना अनेक स्पर्धांपासून मुकावे लागले आहे.
राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धा होत असतात. त्या स्पर्धेमध्ये बेळगावमधील अनेक दिव्यांग तसेच इतर जलतरणपटूंनी सुवर्णपदके मिळविली आहेत. देशामध्ये बेळगावने जलतरण स्पर्धांमध्ये एक वेगळे नाव कमाविले आहे. अनेक स्पर्धक विविध स्पर्धांमध्ये चमकले आहेत. तेंव्हा याचा कोठेतरी गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. सर्व क्षेत्रांना ज्या पद्धतीने मुभा देण्यात आली आहे, त्याप्रमाणे मुभा
द्यावी.
स्वीमिंग पूल प्रशिक्षक, संरक्षक, कर्मचारी हे देखील या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. तेंव्हा पूर्वीसारखेच स्वीमिंग पूलना परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उमेश कलघटगी, राघवेंद्र आर. ए., अजय पै, शाम मालाई, मनोज जाधव, प्रशांत पाटील, पूजा मालाई, विनोद दोडमनी, अक्षय शेरेगार यांच्यासह कोच व जलतरणपटू उपस्थित होते.