प्रतिनिधी / बेळगाव
एकीकडे वीज बचतीसाठी हेस्कॉमकडून लाखो रुपये खर्च केले जात असताना त्यांच्याच कार्यालयात दिवसाही पथदीप सुरू असल्याचे सोमवारी दिसून आले. दुपारी 2 वाजता पथदीप सुरू ठेवण्यात आल्याने बिल भरण्यासाठी येणाऱया नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. केपीटीसीएल कार्यालय परिसरातील सर्वच पथदीप सोमवारी सुरू होते.
दिवसादेखील पथदीप सुरू ठेवण्याचे प्रकार अनेकवेळा घडत आहेत. एकीकडे शहरात अनेक पथदीप बंद असल्याने त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असताना दुसरीकडे मात्र दिवसाही पथदिपांचा झगमगाट सुरू असल्याचे वारंवार दृष्टीस पडत आहे.
नेहरूनगर येथील हेस्कॉम-केपीटीसीएल कार्यालयात सोमवारी रस्त्याशेजारी असणारे सर्व पथदीप सुरू होते. दुपारपर्यंत पथदीप सुरू असल्याने विजेच्या होणाऱया अपव्ययाला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.