वृत्तसंस्था/ होबार्ट
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या बिग बॅश टी-20 लीग स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात मेलबर्न रेनिगेड्स संघाने यजमान होबार्ट हरीकेन्सचा 6 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात मेलबर्न रेनिगेड्स संघाकडून खेळताना भारताची कर्णधार हरमनप्रित कौर आणि रॉड्रिग्यूज यांनी चमकदार कामगिरी केली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना होबार्ट हरीकेन्सचा डाव 121 धावात आटोपला. त्यानंतर मेलबर्न रेनिगेड्सने 4 बाद 122 धावा जमवित हा सामना 6 गडय़ांनी जिंकला. मेलबर्न रेनिगेड्स संघाचे फिरकी गोलंदाज मॉलीनेक्सने 12 धावांत 2 तर व्हेरहॅमने 13 धावांत 3 गडी बाद केले. रिचा घोषने 14 चेंडूत 21 धावा जमविल्या. त्यानंतर मेलबर्न रेनिगेड्सच्या डावात रॉड्रिग्यूज आणि कर्णधार मॉलीनेक्सने सलामीच्या गडय़ासाठी 22 धावा जमविल्या. मॉलीनेक्सने 16 चेंडूत 16 धावा केल्या. रॉड्रिग्यूजने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 34 चेंडूत नाबाद 33 धावा फटकाविताना वेब समवेत दुसऱया गडय़ासाठी 68 धावांची भागिदारी केली. वेबने 31 धावा जमविल्या. हरमनप्रित कौरने 19 चेंडूत नाबाद 24 धावा झळकविल्या.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या दुसऱया एका सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्सने सिडनी थंडरचा 30 धावांनी पराभव केला. या सामन्यात स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांची कामगिरी चांगली झाली नाही.
प्रथम फलंदाजी करताना ऍडलेड स्ट्रायकर्सने 20 षटकांत 7 बाद 140 धावा जमविल्या. कर्णधार मॅकग्राने 42 तर पेनाने 35 धावांचे योगदान दिले. सिडनी थंडरच्या दीप्ती शर्माने 1 गडी बाद केला. त्यानंतर सिडनी थंडरचा डाव 110 धावांत आटोपला. या संघातील भारताच्या मानधना आणि दीप्ती शर्मा प्रत्येकी 4 धावांवर बाद झाल्या. हे सामने बंदिस्त स्टेडियमवर प्रेक्षकांविना खेळविले गेले.