वृत्तसंस्था/ कोलकाता
इंग्लंडविरूद्ध होणाऱया आगामी टी-20 मालिकेसाठी नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये अष्टपैलू राहुल तेवातियाचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान येथे रविवारी झालेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात देवातियाने 39 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांसह 73 धावांच्या खेळीच्या जोरावर आपल्या हरियाणा संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात हरियाणाने चंदीगडचा पराभव केला.
हरियाणा संघातर्फे खेळताना तेवातियाने राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धामध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखल्याने त्याची इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या आगामी टी-20 मालिकेसाठी भारतीय संघामध्ये सुर्यकुमार यादव, इशान किशन, आणि वरूण चक्रवर्ती या नवोदितांनाही संधी देण्यात आली आहे.