कँटरचालक जखमी : वऱहाडी टेम्पोलाही अपघात
प्रतिनिधी /बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा ब्रिजवर अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत एकाच ठिकाणी तीन अपघात घडले असून केवळ सुदैवाने या अपघातात प्राणहानी झाली नाही.
शनिवारी रात्री ऊसवाहू ट्रक्टर आणि मालवाहू टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात टेम्पोमधील रफिक इब्राहिम बाडगी (वय 46) रा. दावणगेरे हा चालक जखमी झाला. सुरुवातीला त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातंनर तेथून खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे.
शनिवारी रात्री ज्या ठिकाणी अपघात घडला होता, त्याच ठिकाणी रविवारी एका खासगी आरामबसलाही अपघात झाला. या अपघातात कोणालाही इजा पोहोचली नाही. त्यानंतर वऱहाडी टेम्पोला अपघात झाला. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले. हिरेबागेवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता शनिवारी रात्रीपासून तीन अपघात घडले असले तरी एकाच घटनेची नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले.