वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना, महाप्रसाद, ओटी भरणे आदी तीन दिवस कार्यक्रम
वार्ताहर /किणये
हलगा येथील जीर्णोद्धार केलेल्या मरगाई देवी मंदिराचा लोकार्पण सोहळा रविवारी होणार आहे. यामुळे गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंच, युवक व ग्रामस्थांच्यावतीने लोकार्पण सोहळय़ाची गावात जय्यत तयारी सुरू असून कोरोना नियमावलींचे पालन करून हा सोहळा करण्यात येणार आहे. हलगा गाव स्थापन झाले तेव्हापासून गावबाहेर हे मरगाई देवीचे जागृत मंदिर होते. पूर्वी हे मंदिर कौलारू होते. या कौलारू मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. व पंच कमिटी, युवा वर्ग, गावकरी, महिला आदींनी एकी दाखवून मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प पूर्ण केला. सुंदर असे मंदिर बांधले आहे. पूर्वीचे मंदिर गावाबाहेर दिसत होते. मात्र सध्याही त्याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आले आहे. पण गावचा विस्तार वाढल्याने व मंदिराच्या चोहोबाजूने लोकवस्ती झाली आहे.
शुक्रवारी मरगाई देवीची मूर्ती पाण्यात ठेवण्यात येणार आहे. तसेच शनिवारी हीच मूर्ती धान्यात ठेवण्यात येणार आहे.
रविवार दि. 17 रोजी सकाळी 9.15 ते सकाळी 11 पर्यंत मरगाई देवीच्या मंदिराची वास्तुशांती त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, रुद्राभिषेक, होमहवन, नवग्रह पूजा, त्यानंतर कळसारोहण होईल. या सर्व धार्मिक विधी व कार्यक्रम केदार पीठ शाखा मुत्नाळ मठाचे प. पू. श्री शिवानंद शिवचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रम
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मरगाई देवी मंदिर सेवा कमिटीचे अध्यक्ष धाकलू बिळगोजी हे राहणार आहेत. छत्रपती शिवाजी वाचनालय उद्घाटन खासदार मंगला अंगडी, माजी आमदार संजय पाटील, मंदिराचे उद्घाटन यल्लाप्पा सामजी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मरगाई देवी मूर्ती प्रतिष्ठापना पूजन तानाजी संताजी दाम्पत्य आणि अर्जुन सामजी दाम्पत्य यांच्या हस्ते, कळसारोहण कृष्णा कणबरकर, शिवाजी संताजी तसेच महाप्रसादाचे पूजन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व इतरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी देणगीदारांचा सत्कारही करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी 2 ते 10 पर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस ओटी भरण्याचा कार्यक्रम
सोमवार दि. 18 व मंगळवार दि. 19 रोजी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे. प्रत्येक गल्लीतील महिलांनी मरगाई देवीसाठी विशेष दागदागिने केले आहेत. यामध्ये सोन्याची नथ, कमरपट्टा, पैंजन, किरीट व आरती आदी साहित्याचा समावेश असून हे साहित्य देण्यात येणार आहे.
गावातील सर्व समाजाच्या नागरिकांनी या सोहळय़ासाठी सहकार्य करावे व सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे अध्यक्ष धाकलू बिळगोजी, उपाध्यक्ष बाबू देसाई व मंदिर कमिटी, पंच कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने कळविण्यात आले आहे.