एकहाती सामना फिरवणाऱया सामनावीर मॅथ्यू वेडचा पत्रकार परिषदेत दावा,
डेव्हिड वॉर्नरच्या डबल-बाऊन्स चेंडूवरील षटकारावर संमिश्र प्रतिक्रिया
@ दुबई / वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य लढतीत हसन अलीने मॅथ्यू वेडचा झेल सोडला, तो ऑस्ट्रेलियाच्या विजयासाठी टर्निंग पॉईंट मानला जातो आहे. पण, याच जीवदानाचा लाभ घेत ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून देणाऱया मॅथ्यू वेडने मात्र ही बाब फेटाळून लावली. हसन अलीने तो झेल टिपला असता तरी आम्ही हा सामना जिंकू शकलो असतो, असा दावा मॅथ्यू वेडने केला.
हसन अलीने सदर झेल सोडला, त्यावेळी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 चेंडूत 20 धावांची आवश्यकता होती. या चेंडूवर वेडने दुहेरी धावा घेतल्या आणि उर्वरित 9 चेंडूत 18 धावा, असे समीकरण असताना सलग तीन षटकार खेचत ऑस्ट्रेलियाला अतिशय सनसनाटी विजय मिळवून दिला.
या निर्णायक क्षणी हसन अलीकडून झालेली चूक पाकिस्तानसाठी महागडी ठरली आणि त्यांचे वर्ल्डकपमधील आव्हानच संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात मॅथ्यू वेडसह सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे (30 चेंडूत 49) योगदान देखील विशेष महत्त्वाचे ठरले होते.
‘त्या सोडलेल्या झेलाबद्दल काही सांगणे कठीण आहे. पण, त्यावेळी सामना आमच्या बाजूने झुकत चालला होता. हसन अलीने झेल टिपला असता आणि मी बाद झालो असतो तर पुढे काय झाले असते, याचा अंदाज वर्तवणे वेगळे. पण, मार्कस स्टोईनिस बहरात होता, पूर्ण सेट झाला होता आणि पॅट कमिन्स फलंदाजीला येणार होता. त्यामुळे, मी बाद झालो असतो तरी आमच्या सहकाऱयांनी तो सामना जिंकून दिला असता. हसन अलीने झेल सोडला, हे आमच्या विजयाचे एकमेव कारण अजिबात नाही’, असे मॅथ्यू वेड पुढे म्हणाला.
‘धावांचा पाठलाग करताना, दडपणाची स्थिती हाताळताना अनुभव अतिशय महत्त्वाचा असतो आणि माझ्यासाठी अनुभवच महत्त्वाचा ठरला. आम्ही प्रारंभी काही विकेट्स लवकर गमावले आणि धावसरासरीच्या निकषावर देखील बॅकफूटवर होतो. पण, ड्रेसिंग रुममध्ये गोंधळाची स्थिती अजिबात नव्हती. अनुभवी खेळाडू हाताशी असल्याने हा सामना फिरवता येऊ शकतो, याची खात्री वाटत होती’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
पाकिस्तानी चाहत्यांचाही उल्लेख
दुबई स्टेडियमवरील या लढतीत पाकिस्तानी चाहते हजारोंच्या संख्येने हजर होते आणि त्या निकषावर देखील पूर्ण सामन्यात आमच्यासाठी प्रतिकूल स्थिती होती. आम्ही चौफेर फटकेबाजी केली तरी पाठबळ दर्शवणारे चाहते आमच्याकडे नव्हते, असे मॅथ्यू वेड पुढे म्हणाला. ‘हसन अलीने माझा झेल सोडला, त्यावेळी सर्व परिस्थिती आमच्या आटोक्यात होती. त्या स्थितीतून विजयाचे लक्ष्य गाठणे इतके कठीण नव्हते’, असे त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
बाबर आझमचा असाही यू टर्न!
प्रथम पराभवाचे खापर हसन अलीवर फोडले आणि नंतर घुमजावही केले!
महत्त्वाच्या उपांत्य लढतीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या अपयशाचे खापर प्रारंभी हसन अलीवर फोडले होते. पण, नंतर त्याने सारवासारव करत खेळाडू झेल सोडू शकतात आणि खेळाचा हा एक भाग असतो. यासाठी कोणत्याही खेळाडूला लक्ष्य करणे योग्य ठरत नाही, अशा शब्दात घुमजाव केले.
शाहिन आफ्रिदीच्या डावातील 19 व्या षटकात मॅथ्यू वेडने सनसनाटी 3 षटकारांमुळे ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आणि त्यानंतर पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनमध्ये बाबर आझमने हसन अलीकडून सुटलेल्या झेलाचा उल्लेख केला होता. तो झेल घेतला असता तर वेगळे चित्र दिसले असते, असे आझम त्यावेळी म्हणाला होता. नंतर आयोजित पत्रकार परिषदेत मात्र बाबर आझमने सावध पवित्र्यावर भर देणे पसंत केले.
‘तो झेल सोडला नसता तर वेगळे चित्र दिसले असते. पण, काही वेळा अशा चुका होत असतात’, असे आझम याप्रसंगी म्हणाला. पूर्ण स्पर्धेत हसन अली बहरात नव्हता आणि त्याने झेल सोडल्यामुळेच पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले का, या प्रश्नावर बाबर आझमने नकारार्थी उत्तर दिले.
‘हसन अली आमचा मुख्य गोलंदाज आहे आणि त्याने पाकिस्तानला अनेक सामने जिंकून दिले आहेत. सध्या तो झगडत आहे. पण, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. सर्व खेळाडू प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम खेळू शकत नाहीत, हे आपण लक्षात घ्यायला हवे’, असे आझम पुढे म्हणाला. हसन अली या लढतीत गोलंदाजीत देखील महागडा ठरला होता. त्याला 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना एकही बळी न घेता 44 धावा मोजाव्या लागल्या. बाबर आझमने मात्र टीम कॉम्बिनेशनचे देखील समर्थन केले.
‘आमच्याकडे शोएब मलिक व मोहम्मद हाफीझ असे फिरकीतील पर्याय होते. एकूण 4 फिरकीपटू संघात होते. हाफीझ पूर्ण बहरात नव्हता. त्यामुळे, मी त्याला आणखी षटके दिली नाहीत. शाहिन व हॅरिस रौफ यांनी उत्तम मारा केला. शिवाय, शदाबचा भेदक मारा लक्षवेधी होता. अंतिमतः निकाल आमच्या बाजूने लागला नाही. पण, येथील चुकांपासून धडे घेण्यावर आमचा भर असेल’, असे त्याने शेवटी नमूद केले.
बॉक्स
डेव्हिड वॉर्नरच्या ‘त्या’ डबल-बाऊन्स षटकारावर गौतम गंभीरचे टीकास्त्र ऑस्ट्रेलियाच्या डावातील आठव्या षटकात हाफीझ गोलंदाजी करत असताना एकदा चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि दोन टप्पे पडत वॉर्नरच्या आवाक्यात आला. वॉर्नरने ही नामी संधी अजिबात दवडली नाही आणि डीप मिडविकेटच्या दिशेने धडाकेबाज षटकार वसूल केला. चेंडूचे दोन टप्पे पडल्याने मैदानी पंचांनी हा नोबॉल ठरवला आणि यामुळे ऑस्ट्रेलियाला फ्री हिट देखील मिळाली. मात्र, वॉर्नरने या नोबॉलचा लाभ घेत मोठा फटका मारणे खिलाडूवृत्तीत बसत नसल्याची टीका गौतम गंभीरने केली. शेन वॉर्न व गौतम गंभीर खिलाडूवृत्तीच्या बडय़ा गप्पा मारत असतात. त्यांचे या घटनेवर काय मत आहे, असा प्रश्नही गंभीरने येथे उपस्थित केला