खा. धैर्यशील माने यांचे आवाहन
वारणानगर/प्रतिनिधी
हातकंणगले लोकसभा मतदार संघातील सर्वंकष पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचे धोरण निश्चित केले असून मतदार संघातील ज्या गावात पर्यटनाच्या संधी आहेत अशा गावांनी आपल्याकडे प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन खासदार धैर्यशील माने यानी केले.
पन्हाळा तालुक्यातील पत्रकारांचा संवाद मेळावा माजी आ. सत्यजित पाटील यांच्या उपस्थितीत कोडोली येथे संपन्न झाला. या प्रसंगी खा. माने यानी मतदार संघातील पर्यटन आणि त्यामाध्यमातून उपलब्द होणारे उद्योग व रोजगार याची माहिती दिली. प्रत्येक गावातून किंवा ज्या गावांना पर्यटनाला संधी आहेत. त्या ठिकाणी शासनाने कोणत्या पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत या अनुषंगाने प्रस्ताव येणे गरजेचे आहे असे खा. माने यानी सांगीतले.
राज्याचे पर्यटनमंत्री ना.आदित्य ठाकरे यानी याबाबत मंजूरी दिल्यावर प्राथमिक स्तरावर तीर्थक्षेत्र व यात्रा स्थळाच्या पर्यटन विकासासाठी सांगली जिल्हा – शिराळा तालुक्यातील चांदोली पर्यटन, भुईकोट किल्ला, गोरक्षनाथ मंदिर,वाळवा तालुक्यातील शिरटे येथील सिताईदेवी मंदीर,कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील जोतिबा,पन्हाळागड, पांडवकालीन लेणी, बांदिवडे, शाहूवाडी तालुक्यातील आंबा, पावणखिंड, बर्की, उदगिरी, विशाळगड, शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, नृसिंहवाडी, हातकणंगले तालुक्यातील अल्लमप्रभू, कुंथुगिरी, धुळोबा, रामलिंग, बाहुबली, खोची येथील पर्यटन क्षेत्राचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश पर्यटन पुणे विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याना दिले आहेत, असेही खा. माने यानी सांगीतले.