ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
‘जमात-उद-दावा’ संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने 15 वर्ष तुरुंगवास आणि 2 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हाफिज लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आहे. 2001 साली अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने या संघटनेला दहशतवादी जाहीर केले. दरम्यान, 2002 मध्ये पाकिस्तान सरकारने या संघटनेवर बंदी घातल्यानंतर सईदने जमात-उद-दावाची स्थापना केली. त्याच्यावर टेरर फंडिंग (दहशतवाद्यांना पैसे पुरवणे), मनी लाँडरिंग आणि मालमत्तांचे अवैध ताबे घेतल्याप्रकरणी 41 गुन्हे दाखल आहेत. 70 वर्षीय हाफिजला न्यायालयाने चार विविध प्रकरणात 21 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. हाफिजला सर्व शिक्षा एकत्र भोगाव्या लागणार आहेत.
हाफिज हा मुंबई 26/11 हल्ल्याचा सूत्रधार असून, या प्रकरणात त्याचे साथीदार जफर इक्बाल आणि याह्या मुजाहिद यांना यापूर्वीच प्रत्येकी पाच वर्षे आणि आणखी एका प्रकरणात प्रत्येकी 6 महिन्यांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे.