प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱया एका वृद्ध कैद्याचे शनिवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
मारुती रागीपाटील (वय 77, रा. तारिहाळ) असे त्याचे नाव आहे. खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने त्याला सात वर्षांची शिक्षा ठोठावली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने त्याला तीन महिन्यांचा पॅरोल मंजूर केला होता.
9 एप्रिल रोजी मारुतीची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. 9 जुलै रोजी पॅरोलची मुदत संपल्यामुळे त्याला पुन्हा कारागृहात आणण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. शनिवारी श्वसनाचा त्रास जाणवल्याने सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.