प्रतिनिधी/ बेळगाव
रविवार दि. 2 रोजीच्या बुलकच्या ई-बैठकीत विजयालक्ष्मी देवगोजी यांनी ‘व्रत आणि इतर कथा’ या श्री फकीर मो. कटपाडींनी लिहिलेल्या कथासंग्रहाचा सोप्या व सुंदर भाषेत ऑडियोद्वारे परिचय करून दिला. मानवी मनाचा शोध घेणाऱया कथा असे शीर्षक त्यांनी या कार्यक्रमाला दिले. मूळ कन्नड ब्यैरी या करावळी म्हणजे तटीय प्रदेशातील मुसलमानांच्या ब्यैरी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद सुप्रसिद्ध लेखिका उमा कुलकर्णी यांनी केला आहे. एकूण तेरा कथांमधून मुस्लीम समाज, त्यांच्यातील बुरखा, हज यात्रा, तलाक, मौलवी, बहुपत्नीत्व, तलाकपीडित कन्या, किंवा बापाला पोरका झालेला मुलगा, मशिदीला देणगी, मदरसातील शिक्षण, पवित्र कुराणाची घ्यावयाची काळजी, मेल्यावर उघडणारे स्वर्गाचे दार, जेवताना अन्न पानाबाहेर पडू नये याची काळजी, मुसलमान असूनही अम्मा-अप्पा शब्दांचा प्रयोग या व इतर चालीरिती व अनेक गोष्टी विजयालक्ष्मींनी मांडल्या व सागरी प्रदेशातील आपल्या मुसलमान समाजबांधवांची ओळख करून दिली.