वार्ताहर /हिंडलगा
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर काही मूठभर कन्नड गुंडांनी भ्याड हल्ला केला. अंगावर शाई फेकून समस्त सीमावासियांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ मंगळवार दि. 14 रोजी म. ए. समितीने पुकारलेल्या बेळगाव बंदला तालुक्मयाच्या पश्चिम भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंडलगा, बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, मण्णूर परिसरात संतप्त नागरिकांनी आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवून कर्नाटक सरकारला मराठी बाण्याचे दर्शन घडविले.
तालुक्मयाचा पश्चिम भाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे महामेळाव्यादिनी अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर पोलिसांचा आडोसा घेऊन कन्नड गुंडांनी भ्याड हल्ला केल्याने परिसरातील मराठी भाषिकांत संतापाची लाट उसळली आहे. हल्ला झाल्याचे वृत्त समजताच सोमवारी दुपारपासूनच परिसरातील प्रत्येक गावामध्ये निषेध नोंदवून कर्नाटक सरकारचा धिक्कार करण्यात आला. मंगळवार दि. 14 रोजी समितीने पुकारलेल्या बेळगाव बंदला हिंडलगा, विजयनगर, गणेशपूर, मण्णूर, गोजगा, आंबेवाडी, सुळगा (हिं.), बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, हंगरगे आदी गावांतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सर्व दैनंदिन व्यवहार, दुकाने व व्यवसाय बंद ठेवून जाहीर पाठिंबा दिला. ठिकठिकाणी सभा घेऊन अन्यायी कर्नाटक सरकारचा निषेध नेंदविण्यात आला. सर्वांनी व्यवहार बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.