जेएनयु प्रकरण, अध्यक्ष पिंकी चौधरीने प्रसारित केला व्हिडीओ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापिठामध्ये झालेल्या हिंसाचार आणि मारामारी प्रकरणाची जबाबदारी हिंदू रक्षा दलाने स्वीकारली आहे. दलाचा राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र तोमर याने याबाबत एक व्हीडिओ प्रसारित करुन हा खुलासा केला आहे. जेएनयु कॅम्पसमध्ये कोणत्याही प्रकारच्या देशविघातक कारवाया आणि कृत्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशाराही त्याने या क्लीपमध्ये दिला आहे. अन्य कोणत्याही विद्यापिठामध्ये अशी कृत्ये होत असतील तेथेही अशाच प्रकारची कारवाई केली जाईल, असेही त्याने म्हटले आहे.
रविवारी जेएनयु कॅम्पसमध्ये काही बुरखाधाऱयांनी घुसखोरी करत विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मारहाण केली होती. त्यानंतर देशभर या घटनेचा निषेध करण्यासह आंदोलने करत केंद्र सरकारचा निषेध केला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्यासह हिंसक कारवायाबाबत गुन्हा दाखल केला आहे.
जेएनयुमध्ये रविवारी झालेल्या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी हिंदू रक्षा दलाचा राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र तोमरने घेत व्हीडीओ प्रसारित केला आहे. जेएनयुमधील विद्यार्थ्यांना मारहाण करणारे त्याचे कार्यकर्ते होते. जेएनयुमध्ये देशविघातक कारवाया होत असतात, त्या आम्ही सहन करु शकत नाही, असे त्याने म्हटले आहे. तर पिंकी चौधरी याने म्हटले आहे की, जर कोणी देशविघातक, देशविरोधी कारवाया करत असतील, कट रचत असतील तर त्यांना याच भाषेत उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.
हिंदू रक्षा दलाने याची जबाबदारी स्वीकारली असली तरी पोलिसांनी व तपास यंत्रणांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. या कबुलीजबाबामध्ये अजून कोणतेही तथ्य आढळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जेएनयु छात्र संघटनेच्या आयुषी घोषवर गुन्हा दाखल
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी जेएनयु छात्र संघाची अध्यक्ष आयुषी घोष हिच्यासह 19 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हे गुन्हे सुरक्षा रक्षकांना मारहाण करणे आणि सर्व्हररुममध्ये तोडफोड करण्याबाबत दाखल केल्याचे म्हटले आहे. याचबाबत 5 जानेवारीला जेएनयु प्रशासनानेही तक्रार दाखल केली होती. तर सर्व्हर बंद झाल्याने हिवाळी सत्राच्या नोंदणीसह सर्व कामे थांबली आहेत. विद्यापिठ प्रशासनाने म्हटले आहे की सर्व्हर बंद पाडणाऱयांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच सर्व विद्यार्थ्यांना फेर नोंदणी करावी लागणार आहे.