नाझी थीमचा विवाहसोहळा पाहून लोक दंग
स्वतःचा विवाहसोहळा इतरांपेक्षा वेगळा असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. याचमुळे लोक या विशेष दिवसापूर्वी मोठी तयारी करत असतात. अनेक जण विवाह सोहळय़ाला वेगवेगळय़ा थीमच्या हिशेबाने आयोजित करतात. यात अनेकदा विशेष रंगाचा पोशाख स्वतःच्या पाहुण्यांसाठी निवडला जातो. अशाचप्रकारचा विवाह मेक्सिकोच्या एका जोडप्याने केला असून यात त्यांनी नाझींचे रुप धारण करत परस्परांशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
मेक्सिकोच्या त्सलकालामध्ये मागील महिन्यात एका जोडप्याने स्वतःच्या विवाहाची थीम जर्मनीच्या नाझी पार्टीवर आधारित ठेवली होती. त्यांच्या विवाहसोहळय़ात सर्वकाही जर्मन नाझींप्रमाणे होते. वर नाझी सैनिकाप्रमाणे तयार होत रस्त्यावरून निघाल्यावर त्याला पाहणाऱया लोकांनी त्याची तुलना हिटलरशी केली. नाझींकडून वापरली गेलेली फोक्सव्हॅगनची बीटल कार या जोडप्याने विवाहाकरता वापरली आहे. तसेच या कारवर नाझी पार्टीचे चिन्हही काढण्यात आले होते.
फर्नांडो आणि जोसेफिना यांनी हा विवाह 29 एप्रिल रोजी केला आहे. याच तारखेला हिटलर आणि त्याची पत्नी ईवा ब्राउन यांची मॅरेज ऍनिव्हर्सरी असते. फर्नांडो आणि जोसेफिना यांचा विवाह मेक्सिकोच्या कॅथोलिक चर्चमध्ये पार पडला आहे.
मुलांना नाझींशी निगडित नावे
या जोडप्याला विवाहापूर्वीच दोन मुले असून त्यांना नाझींशी निगडित नावेच देण्यात आली आहेत. मुलाचे नाव रेनहर्ड असून हे नाव हिटलरच्या सैन्याचे जनरल रेनहर्ड हेड्रिक यांच्या नावावर देण्यात आले आहे. मुलीचे नाव हॅना गर्ट्रड ठेवण्यात आले आहे. जर्मन सैन्यात हॅना गर्ट्रड नावाची वैमानिक होती, जिने हिटलरचा जीव वाचविला होता.