लडाखमध्ये लोकांनी अवलंबिला अभिनव मार्ग
लडाखमध्ये कधीकाळी लोक स्वतःच्या प्राण्यांना वाचविण्यासाठी लांडग्यांचा जीव घेत होते. तेथे लोक लांडग्यांना शांगदोंगमध्ये (एकप्रकारचे दगडांचे जाळे) अडकवायचे, ज्यात त्यांचा मृत्यू व्हायचा. यामुळे आता लांडग्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. हाच धोका पाहता एका संस्थेने त्यांच्या संस्थेसाठी अनोखा पुढाकार घेतला आहे. आता लांडग्यांना वाचविण्यासाठी शांगदोंगांना स्तूपाचे स्वरुप दिले जातेय. लांडग्यांच्या संरक्षणाची ही यशस्वी कहाणी प्रंटियर या आंतरराष्ट्रीय इकोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
लडाखच्या लोकांचा विश्वास प्राप्त करत संस्थेने त्यांच्या समस्यांबद्दल जाणून घेतले. त्यानंतर त्यांना लडाखच्या पारंपरिक शांगदोंगला धार्मिक स्तुपांमध्ये बदलण्यासाठी प्रवृत्त केले, यातून लांडग्यांना वाचविण्यासाठी मदत झाली. लांडग्यांच्या संरक्षणाची सुरुवात करण्यापूर्वी लडाखचे अनेक दौर केले आणि स्थानिकांची संवाद साधला. याचबरोबर स्थानिक लोकांशी एक दीर्घकालीन संबंध प्रस्थापित केले. या चर्चेनंतर स्थानिक लोक पाळीव प्राण्यांना वाचविण्यासाठी लांडग्यांना मारत होते हे आम्हाला कळल्याचे नेचर कॉन्झर्व्हेशन फाउंडेशनचे फील्ड मॅनेजर करमा सोनम यांनी सांगितले आहे.
लांडग्यांच्या शिकारीत सामील समुदायाच्या सदस्यांना दंड करण्याचा आम्ही विचार मांडला नाही. याचबरोबर स्थानिकांच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा असलेला शांगदोंग नष्ट करण्याचाही प्रयत्न केला नसल्याचे ते म्हणाले. करमा सोनम यांना मागील वर्षी लांडग्यांच्या संरक्षणाच्या विशेष प्रयत्नांसाठी नेटवेस्ट अर्थ हीरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिमालयीन लांडग्यांच्या संरक्षणाच्या प्रयत्नावर एक लघूपट तयार करण्यात आला आहे.