सातारकरांमध्ये हळहळ- अर्धापूर तालुक्यात झाला अपघात
प्रतिनिधी/ सातारा
साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी सातारच्या 9 महिला हिरकणी बाईक रायडर्स ग्रुपच्या माध्यमातून दुचाकीवरून निघालेल्या शुभांगी संभाजी पवार या 32 वर्षीय महिला रायडरचा अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे अपघात झाला. या अपघातात टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने शुभांगी यांचा अपघात ठिकाणीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेने साताऱयात हळहळ व्यक्त आहे.
सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या 10 ऑक्टोबर रोजी 1 हजार 868 किमी प्रवासासाठी मोटार सायकलने नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाल्या. कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन ते तुळजापूर येथे पोहचल्या.
आई तुळजाभवानीचे दर्शन करून पुढील माहूर गडाची रेणुकामाता दर्शनासाठी जात असताना भोकर फाटा दाभड येथे टँकर सोबत शुभांगी पवार यांच्या दुचाकीचा अपघात झाला. टँकरची जोरदार धडक बसल्याने शुभांगी पवार जागीच ठार झाल्या. अपघातानंतर शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर जि. नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले आहे. या घटनेने साताऱयात हळहळ व्यक्त आहे. दरम्यान, रात्री 7 च्या सुमारास शुभांगी पवार यांचा मृतदेह साताऱयात आणला गेला. यावेळी नातेवाईकांसह सातारकरांच्या अश्रूंना आवरता येत नव्हते. यावेळी मृतदेहाचे दर्शन घेण्यासाठी राधिका रोड वरील कदम पेट्रोल पंप परिसरातील त्यांच्या निवासस्थानी गर्दी झाली होती.
सातारची हिरकणी गमवल्याची खंत
शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी बाईकवरुन रवाना झालेल्या 9 हिरकणींच्या मोहिमेला सातारकरांनी शुभेच्छा दिल्या होत्या. रस्ते अपघात व ब्रेस्ट कॅन्सरबाबत या हिरकणी प्रबोधन करत निघाल्या असताना भोकरफाटय़ावर हिरकणी शुभांगी पवार यांचा अपघातात अंत झाल्याची घटना कळताच अवघी शाहूनगरी हेलावली. सोशल मीडियावर शुभांगी यांना श्रध्दांजली अर्पण करताना हिरकणी गमावल्याची खंत व्यक्त सातारकर दुःख व्यक्त करत होते.