प्रतिनिधी/ बेळगाव
भारतीय रेल्वेचा इतिहास उलगडून दाखविणाऱया हुबळी येथील रेल्वे संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ऑनलाईन या संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी, नैऋत्य रेल्वेचे व्यवस्थापकिय संचालक ए. के. सिंग, हुबळी विभागिय व्यवस्थापक अरविंद मलकारे उपस्थित होते.
हुबळी रेल्वे स्थानकातील गदग रोड येथे भव्य संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयामध्ये रेल्वेच्या प्रारंभीच्या काळापासून आतापर्यंत झालेले बदल पाहता येणार आहेत. याचबरोबर चित्र फितीच्या सहाय्याने संपूर्ण इतिहास उलगडला जाणार आहे. या ठिकाणी विविध सोयी सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. उत्तर कर्नाटकातील हे पहिलेच रेल्वे संग्रहालय असणार आहे.
रविवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संग्रहालयाचा लोकार्पन सोहळा पार पडला. रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी नैऋत्य रेल्वेचे कौतुक करत राबविलेला प्रकल्प नागरिकांच्या माहितीमध्ये भर घालणारा ठरेल असे गौरवोद्गार काढले.