प्रतिनिधी /वास्को
हेडलॅण्ड-सडा भागात बुधवारी पहाटे एका घरात आग आल्याने घरगुती साहित्य जळून खाक झाले. यात काही लाख रूपयांचे नुकसान झाले. शेजारी पाजारी व अग्नीशामक दलाने धावपळ करून घराला आगीपासून वाचवले.
बुधवारी पहाटे अडिचच्या सुमारास ही आग लागली. या घरात विद्याधर नागवेकर व त्यांची पत्नी हे वध्द दांपत्य होते. आग लागल्याने पत्नीला जाग आली. त्यामुळे तीने घरातील कळशीने पाणी मारायला सुरवात केली. पत्नीने गोंधळ केल्याने बाहेर झोपलेल्या पतीलाही जाग आली. त्याने लगेच शेजाऱयाला हाक मारून बोलावले. इतर sशेजारीही जागे होऊन त्यांनी धावपळ करून आग विझवीली. तोपर्यंत अग्नीशामक दलही दाखल झाले. मात्र तोपर्यंत या आगीत घरातील फ्रीझ, वॉशिंग मशिन, घरातील काही फर्निचर, रोख रक्कम व काही दागिने व बरेच घरगुती साहित्य खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी बुधवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच या कुटुंबाला सरकारी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.