प्रतिनिधी /वास्को
हेडलॅण्ड सडय़ावरील कचरा प्रक्रिया प्रकल्प हा स्थानिक नागरिकांसाठी मागच्या पंधरा वर्षांपासून डोकेदुखी ठरलेला असून हा प्रश्न आपण मार्गी लावणार असल्याचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे. या प्रकल्पाला दिवसा 15 टन कचऱयावर प्रक्रिया करणाऱया यंत्रणेची गरज असून प्रत्यक्षात या ठिकाणी दिवसा केवळ 5 टन कचऱयावर प्रक्रीया होते व उर्वरीत 10 टन कचरा डंप केला जातो असे आमदार संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी शुक्रवारी हेडलॅण्ड सडय़ावरील गोवा गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीला भेट देऊन तेथील नागरिकांसमवेत विविध समस्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेविका श्रध्दा आमोणकर यांच्यासह पोलीस, वीज खात्याचे अधिकारी, गृहनिर्माण मंडळाचे अधिकारी, मुरगाव पालिका कर्मचारी व अधिकारी व इतर खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी या भागातील विविध समस्या अधिकाऱयांच्या नजरेस आणून दिल्या व त्या त्वरीत सोडवाव्यात अशी मागणी केली.
जीआरबी कॉलनीतील विविध समस्या सोडवण्याच्या अधिकाऱयांना सुचना
या भागात पथदीप व्यवस्था गायब झाल्याने रात्री काळोखात चोरटय़ांना चोरीच्या संधी मिळत आहेत. चोऱया वाढलेल्या आहेत. झाडे झुडपे वाढलेली आहेत, त्याचाही फायदा गैरकृत्त्ये करणाऱयांना होत आहे. तेथील पाण्याच्या टाक्यांची सफाई होत नसल्याने रोगराई पसरण्याची भिती आहे. सांडपाणी व भुगटार उघडय़ावर वाहत असल्याने गलिच्छता आहे. मान्सूनपूर्व कामेही झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळय़ा लोकांचे हाल होतील असे सांगून पालिकेने व अन्य विभागाच्या अधिकाऱयांनी कामाला लागण्याची सुचना त्यांनी केली. चोऱया टाळण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी अशीही सुचना त्यांनी केली. या भागात लोकांच्या मुलभूत समस्या असून त्या सोडवण्याची गरज आहे. त्यासाठी पुन्हा संबंधीत खात्यांच्या अधिकाऱयांसमवेत बैठक घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. आरोग्य खात्याकडेही येथील समस्या मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापनसंबंधीत अधिकाऱयांशी बैठक घेऊन हेडलॅण्ड सडय़ावरील कचरा विल्हेवाटीच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आमदार संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे.
कचरा विल्वेवाटीच्या प्रश्नावर आमदार आमोणकर यांची माजी नगरविकासमंत्र्यांवर टीका
आमदार आमोणकर यांनी मुरगाव पालिकेच्या मान्सूनपूर्व कामांबाबत नाराजी व्यक्त करून पालिकेने कोणतीही पूर्वतयारी केलेली नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्याकडे पावसाचे काहीच पूर्व नियोजन नसल्याचे आमदार अमोणकर यांनी म्हटले आहे. पालिका हाताळीत असलेला सडय़ावरील कचरा प्रक्रिया प्रकल्प हा दिर्घ काळा भिजत पडलेला प्रश्न असून जीआरबी कॉलनीतील 360 कुटुंबांसह सडय़ावरील मोठय़ासंख्येने कुटुंबांना या कचऱयाच्या समस्येची त्रास होत आहे. ही समस्या मागच्या 15 वर्षांपासून सतावत आहे. माजी नगरविकासमंत्र्यांनी या ठिकाणी प्रक्रीया प्रकल्प आणला होता. सर्व कचरा हटवण्यात येईल असे त्यांनी लोकांना म्हटले होते. मात्र, तसे झालेले नाही. या ठिकाणी असलेल्या प्रकल्पाची क्षमता दिवसा केवळ 5 टन कचरा हाताळण्याची आहे. दिवसा 15 टन कचरा गोळा होत असतो. त्यामुळे दरदिवशी 10 टन कचरा पडून राहतो व परीसरात दुर्गधी निर्माण होते. या प्रश्नावर स्थानिक लोकांना मागच्या पंधरा वर्षांपासून फसवले गेले आहे. 15 टन क्षमतेची यंत्रणा या प्रकल्पात आवश्यक आहे. अन्यथा लोकांना या ठिकाणी राहणे कठीण होणार आहे. कचऱयाचे ढिगारे आणि दुर्गंधीमुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला आहे. कुत्री लोकांवर हल्ला करीत आहेत. हा प्रश्न गंभीर असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे.