राज्य सरकारचा आदेश : दंडात्मक कारवाईही होणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱयांचा वाहन चालक परवाना (डीएल) तीन महिन्यांसाठी रद्द केले जाणार आहे. राज्य सरकारने सोमवारी यांसंबंधीचा आदेश दिला आहे. अलिकडेच नियमांचे उल्लंघन करणाऱयांकडून आकारण्यात येणाऱया दंडामध्ये मोठी वाढ करण्यात आली होती. आता वाहन चालक परवाना तीन महिने रद्द करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने हेल्मेट सक्तीसंबंधी अनेकवेळा आदेश जारी केले आहेत. तथापि, नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. राष्ट्रीय मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीस्वारांनी (मागील आसनावर बसणाऱयांसह) देखील हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. त्यामुळे दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान न करता वाहन चालविल्यास त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 194-टी नुसार दंडासह किमान तीन महिन्यांसाठी वाहन चालक परवाना रद्द केला जाणार आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत.
मोटार वाहन कायद्यानुसार आदेश
त्याचप्रमाणे विमा (इन्शुरन्स) नसल्यास वाहन चालकाकडून 2 हजार रुपये दंड आणि हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणाऱयाकडून 1 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. यापूर्वी हेल्मेट नसल्यास केवळ दंडात्मक कारवाई केली जात होती. आता 2019 मध्ये दुरुस्ती केलेल्या राष्ट्रीय मोटार वाहन कायद्यानुसार राज्य सरकारने तीन महिन्यांसाठी वाहन चालक परवाना रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे.