कोल्हापूर / नंदकुमार तेली
गल्लीतील लहान मुले, युवकांनी एकत्र येऊन दिवाळीसाठी आकाश कंदील तयार करण्याचा संकल्प केला. त्यानुसार सुमारे एक महिन्यापूर्वीपासून युवकांनी आकाश कंदील तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली. आता दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आली असून आकाश कंदील तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. घरोघरी यंदाच्या दिवाळीत एकसारखे आकाश कंदील पहावयास मिळणार आहेत. या `होम मेड आकाश कंदील’च्या झगमगाटात संपूर्ण परिसर उजाळणार आहे.
आमची गल्ली.. आमचा आकाश कंदील…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन लागू करण्यात आले होते. यामुळे रिकाम्या वेळेत काय करायचे असा प्रश्न युवकांना पडला होता. लक्ष्मीपुरीतील भोई गल्ली तालीम मंडळाच्या लहान मुले, युवकांनी एकत्र येऊन रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी आमची गल्ली... हिरवीगार गल्ली...' हा पहिला उपक्रम राबविण्याचा संकल्प करून परिसरात वृक्षारोपन केले. यानंतर त्यांनी दिवाळीसाठी
आमची गल्ली… आमचा आकाश कंदील…’ हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. त्यानुसार गेल्या महिन्यापासूनप आकाश कंदील तयार करण्याचा कामाला सुरूवात केली. यामध्ये गल्लीतील 9 ते 18 वर्षे वयोगटातील सुमारे 40 ते 50 लहान मुले-मुली, युवक-युवतींनी सहभाग नोंदविला असून उपक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेत आहेत.
घरोघरी एकसारखे `आकाश कंदील’
या उपक्रमासाठी प्रसाद भोपळे व स्नेहा भोपळे यांच्या मार्गदर्शन तर मधुरा कदम, विशाल पाटील, रोहीत खराडे यांचे सहकार्य लाभले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या परवानगीने लहान मुले, युवकांनी एकत्र येऊन आकाश कंदील तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली. यासाठी त्यांनी बुरूड गल्लीतून चिवे, बारीक काटया, फेविकॉल, कापड, झुरमुळया, चमकणारे खडे आदी आकाश कंदील तयार करण्यासाठी लागणाऱया साहित्याची खेरदी केली. आकाश कंदील तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ज्येष्ठ नागरिकांनी प्रोत्साहन देण्यासाठी आकाश कंदील खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे.