मणिपूरमध्ये राहणाऱया एका 10 वर्षीय मुलीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ते पाहून प्रत्येक जण भावुक झाला आहे. मानिंगसिलिउ पमेई नावाची ही मुलगी केवळ 10 वर्षांची आहे. परंतु तिच्यावर स्वतःच्या तान्हुल्या भावाचे पालन करण्याची जबाबदारी आहे. तरीही ती शिक्षण सोडू इच्छित नाही. याचमुळे स्वतःच्या भावाला काखेत घेऊन ती शाळेत जाते.
छायाचित्रात 10 वर्षीय मानिंगसिलिउच्या मांडीवर तान्हुले बाळ दिसून येते. वर्ग सुरू असताना स्वतःच्या भावाला सांभाळण्यासह वहीत ती काहीतरी लिहताना दिसून येते. ही मुलगी दुर्गम जेलियांग्रोंग नागाबहुल तामेंगलोंग जिल्हय़ात राहते. तिचे आईवडिल शेतांमध्ये काम करण्यासाठी जातात. डेलोंग गावात स्वायत्त जिल्हा परिषदेकडून संचालित केल्या जाणाऱया प्राथमिक शाळेत ती इयत्ता पहिलीमध्ये शिकते.
शिक्षणासह भावाची देखभाल
मानिंगसिलिउ चार भावंडांमध्ये सर्वात मोठी आणि आईवडिल कामावर गेल्यावर घर आणि छोटय़ा भावंडांची जबाबदारी तिच्यावरच असते. स्वतःच्या छोटय़ा भाऊबहिणींच्या भरवशावर तिला तान्हुल्या भावाल सोडून जाता येत नसल्याने ती त्याला सोबत घेऊन जाते. तान्हुल्या भावाला उचलून घेत ती पायीच शाळेत पोहोचते.
मुख्यमंत्र्यांनी पाठविले पथक
मुलीचे शिक्षणासाठीचे समर्पण पाहून लोकांनी तिची प्रचंड प्रशंसा केली आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी बालसेवा पथक तिच्या घरी पाठविले. या पथकाने एकीकृत बाल संरक्षण योजनेच्या अंतर्गत मुलीला मदत केली आहे. कुटुंबाला तत्काळ दिलासा म्हणून धान्य प्रदान करण्यात आले. कॅबिनेट मंत्री विश्वजीत सिंह यांनी मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. रोंगमेई नागा विद्यार्थी संघटनेने तिच्या कुटुंबाला 11 हजार रुपयांची मदत केली आहे.