पर्यटन खात्याचा निर्णय, आयोजकांना मोजावी लागणार अतिरिक्त रक्कम
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात यापुढे पर्यटनाशी संबंधित कार्यक्रम आयोजित करायचे झाल्यास आयोजकांना दहा टक्के अतिरिक्त शुल्क वाढ द्यावे लागणार आहे. कार्यक्रमांच्या परवानगीसाठी देय शुल्कात दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय पर्यटन विभागाने घेतला आहे.
पर्यटन हंगामात बिगर परवाना नसलेल्या परिसरात संगीत महोत्सव आयोजित करायचा झाल्यास सध्या 5000 उपस्थितांसाठी 10 लाख रुपये आकारले जातात. त्यावर आता 10 टक्के शुल्क वाढ करण्यात येणार आहे. 5,000 ते 10 हजार उपस्थित तसेच 10 हजार व त्याहून अधिक उपस्थितांसाठी हे अतिरिक्त दहा टक्के शुल्क आकारण्यात येणार आहेत. नाईट बझारसाठी सुधारित शुल्क प्रति हंगाम 60,000 रुपये इतके आहे. मोटारसायकले, कार रॅली, तिकीट नसलेले संगीत महोत्सव, प्रदर्शने आणि पर्यटनाशी संबंधित इतर कार्यक्रम जसे की युवा महोत्सव इत्यादींसाठी 75,000 रुपये एकरकमी (इव्हेंट कालावधीच्या कमाल 30 दिवसांच्या अधीन) शुल्क आहे. हे शुल्क फक्त हंगामात आयोजित कार्यक्रमांसाठी लागू राहणार आहे.
सुधारित शुल्क रचनेत बदल केला असला तरी पर्यटन विभागाकडे भरल्या जाणाऱ्या सुरक्षा ठेवींमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेले नाही.
किंग मोमोच्या निवडीसाठी अर्जाचे आवाहन राज्यात कार्निव्हल महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी कार्निवल परेडसाठी किंग मोमो म्हणून निवड होण्यासाठी पर्यटन विभागाने इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागवले आहेत.