युक्रेनमध्ये रशियाचे क्रौर्य ः स्नायपर अन् मशीनगनने झाडल्या गोळय़ा
युक्रेनच्या कायदा अंमलबजावणी संस्थांच्या अधिकाऱयांनी कीव्ह क्षेत्रात 1084 मृतदेह शोधून काढले आहेत. यातील बहुतांश जणांना गोळय़ा घालून ठार करण्यात आले होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने दिली आहे. तपासकर्त्यांकडून मृतदेहांची पाहणी करत त्यांना फॉरेन्सिक तपासणीसाठी हलविण्यात आल्याचे क्षेत्रीय पोलीस प्रमुख एंड्री नाब्यतोव्ह यांनी म्हटले आहे.
क्षेत्रीय सुरक्षा दल किंवा सैन्याशी कुठलाच संबंध नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना रशियाने ठार केले आहे. 50 ते 70 टक्के जणांना मशीन गन, स्नायपर रायफल, सबमशीन गनने गोळय़ा झाडून ठार करण्यात आले होते. अद्याप 300 मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही. 24 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यावर बेपत्ता असलेले किंवा संपर्कात नसलेल्या लोकांबद्दल माहिती देण्याचे आवाहन नाब्यतोव्ह यांनी युक्रेनच्या नागरिकांना केले आहे. माहिती पुरविण्यासाठी सर्वप्रथम 102 या हेल्पलाइनचा वापर करावा असे त्यांनी म्हटले आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून 21 एप्रिलपर्यंत 2,435 नागरिकांचा मृत्यू झाला असून 2,946 जण जखमी झाल्याची नोंद संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार कार्यालयाने केली आहे. मृतांमध्ये 631 पुरुष, 383 महिला, 42 मुली, 61 मुलांचा समावेश आहे. काही ठिकाणी लढाई सुरू असल्याने ही संख्या अधिक होऊ शकते असे संयुक्त राष्ट्रसंघाकडून सांगण्यात आले. तर मृतांची संख्या 10 हजारांहून अधिक असल्याचा दावा युक्रेनच्या सरकारने केला आहे.
मारियुपोलनजीक सामूहिक कब्र
युक्रेनमधील उद्ध्वस्त झालेल्या मारियुपोल शहरानजीक आणखीन एक सामूहिक कब्र सापडल्याची माहिती महापौरांच्या सल्लागाराने दिली आहे. शहराच्या परिषदेने ‘प्लॅनेट लॅब्स’कडून उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेले छायाचित्र पोस्ट केले असून यात ‘सामूहिक कब्र’ दिसून येत असल्याचे म्हटले गेले. 45 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद या कब्रमध्ये मारियुपोलमधील किमान 1 हजार लोकांचे मृतदेह दफन केलेले असू शकतात असे बोलले जातेय.