अमेरिकेत पाणबुडय़ांचे नशीब चमकले
अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांताच्या दोन पाणबुडय़ांना 11 हजार वर्षे जुना एक अनमोल खजिना सापडला आहे. या पाणबुडय़ांना एका मॅमथचे (प्राचीन हत्ती) चार फूट लांब आणि सुमारे 23 किलो वजनाचे हाड हाती लागले आहे. हे मॅमथचे हाड हिमयुगाच्या कालखंडातील असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे पाणबुडे एका स्थानिक नदीत उतरले होते. डेरेक डेमेटर आणि हेन्री सादलेर अशी त्यांची नावे आहेत.
डेरेक आणि हेन्री यांना पीस नदीच्या तळाला मॅमथचे हे हाड सापडले आहे. हेन्रीने इन्स्टाग्रामवर याचे छायाचित्र प्रसारित केले आहे. असा शोध लावण्याची संधी जीवनात एकदाच मिळते. जीवनात एकदाच सापडणारे जीवाश्म हाती लागल्याने मी अत्यंत सुदैवी आहे. हे छायाचित्र एका कोलंबियन मॅमथच्या पायाचे हाड असल्याचे हेन्री यांनी म्हटले आहे. या मोहिमेदरम्यान पाणबुडय़ांना एका प्राचीन वाघाचे दातही सापडले आहेत.
मॅमथ हे सध्याच्या हत्तींचे पूर्वज होते, जे सुमारे 10 लाख वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेत आले असावेत. सुमारे 11 हजार वर्षांपूर्वी मॅमथ विलुप्त झाले. कोलंबियन मॅमथ सर्वात मोठे प्राणी असायचे, ज्यांची उंची 14 फुटांइतकी होती. या मॅमथचे वजन 5 कार्सइतके हेते. त्यांचे सुळेही विशाल आकाराचे हेते.