अंत्रुजनगर-कुर्टी येथील घटना फोंडय़ात चोरटे पुन्हा सक्रिय
प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा शहरात काल मंगळवारी दिवसाढवळय़ा अंत्रुजनगर, कुर्टी फोंडा येथील अंत्रुजनगर हाऊसिंग बोर्ड कॉलनीच्या तिसऱया मजल्यावरील प्रभू कुटुंबियांचा फ्लॅट फोडून चोरटय़ांनी सुमारे 12 लाख रूपये किमतीचा ऐवज लंपास केला. चोरीची घटना दुपारी 12 वा. ते 3 वा. सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
फेंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंत्रुजनगर कुर्टी-फोंडा येथील निवासी गाळय़ातील विंग-आय इमारतीच्या तिसऱया मजल्यावरील फ्लॅटात हा प्रकार घडला. अज्ञात चोरटयांनी 200 ग्राम वजनाचे 10 लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख दीड लाख रूपयांची रोकड लंपास केली. या घटनेवेळी फ्लॅटात कुणीच नव्हते सदर चोरीचा प्रकार कुटूंबियापैकी मुलगी सायंकाळी फ्लॅटकडे पोचल्यानंतर उघडकीस आला. चोरटय़ानी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश घेतला. चोरटय़ांनी सोन्याचे दागिने लांबविताना कपाटातील महागडया वस्तूसह रोखड लांबविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मुलींच्या लग्नासाठी बनवून ठेवले होते दागिने
सदर फ्लॅटात मुलगी व तिचे वडील असे दोघेचजण राहत आहेत. काही वर्षापुर्वी मिलन प्रभू यांचे निधन झाले असून त्यांचे सोन्याचे दागिने व आपल्या मुलींच्या लग्नासाठी त्यांनी बनविलेले दागिने घरीच सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले होते. नेहमीप्रमाणे काल मंगळवारी मुलगी कॉलेजसाठी तर वडील कामानिमित्त वेर्णा येथे बाहेर पडले होते. सायंकाळी मुलगी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चोरटय़ांनी फ्लॅटाची रेकी केल्यानंतरच दिवसाढवळय़ा हा फ्लॅट फोडण्याचे धाडस केल्याचे दिसून येते.
इमारतीला लागूनच एक फलोत्पादन भाजी विक्री केंद्र आहे. त्याची येणाऱया जाणाऱयावर कायम नजर असते. त्याने दुपारी दुकान बंद केल्यानंतर हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविला आहे. काही फ्लॅटाच्या परिसरात सीसीटीव्ही असून त्याचीही मदत पोलीसांनी घेत याप्रकरणी कसून तपास करून छडा लावावा असे आवाहन केले आहे. दरम्यान रात्री घटनास्थळी श्वानपथक व फॉरन्सिक टिमसह ठसेतज्ञ दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय कुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहे.