पुणे / वार्ताहर :
परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने दोघांची साडेतेरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एज्युकेशन ओवरसिसचे डायरेक्टर सागर साळवी, विक्रांत साळवी, विद्या अमरे यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष वसंतराव जगताप (वय-53,रा. परांडा, जि. उस्मानाबाद) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
अधिक वाचा : मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदार सुभाष जगताप यांच्या मुलाला ओरेबर्ग स्टेट मेडिकल युनिर्व्हसिटी रशिया येथे एमबीबीएसच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. विद्यापीठाची सन 2020-21 व2021-2022 या वर्षाची शैक्षणिक फी म्हणून त्यांच्याकडून साडेआठ लाख रुपये घेतले. हे पैसे आरोपींनी रशियातील विद्यापीठात न भरता त्याचा स्वत:साठी वापर करुन रकमेचा अपहार केला. अशाचप्रकारे सुचा पवार हिच्या पालकांकडूनही एमबीबीएसच्या शिक्षणासाठी शैक्षणिक फी करिता पाच लाख रुपये घेऊन त्यांचीही फसवणूक केली. 13 मे 0218 ते 16 फेब्रुवारी 2022 या काळात हा प्रकार घडला. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.