प्रतिनिधी/ पणजी
पणजीसह राज्यात जोरदार पाऊस झाला. आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असला तरीदेखील 14 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने सायंकाळी दिला.
गेल्या 24 तासांत राज्यात सर्वाधिक 3.5 इंच पाऊस पेडणेमध्ये पडला. वाळपईत 1.5 इंच, सांगे व जुने गोवेमध्ये प्रत्येकी 1 इंच, सांखळी, काणकोण, मडगाव येथे प्रत्येकी पाऊण इंच, इतर पणजी, म्हापसा, केपे व दाबोळी येथे प्रत्येकी अर्धा इंच पावसाची नोंद झालेली आहे. वेधशाळेने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत सरासरी पाऊण इंच पाऊस झालेला आहे. मोसमातील एकूण पाऊस जवळपास 40 इंच झालेला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाच इंच कमीच आहे.
दरम्यान, राज्यातील पावसाचा जोर 14 जुलैपर्यंत राहील. पुढील चारही दिवस गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस व सोबत जोरदार वारे वाहण्याचा इशाराही दिलेला आहे.