’त्या’ आमदारांना केक भेटवून आपची ’गांधी’गिरी
प्रतिनिधी/ पणजी
दोन वर्षांपूर्वी 10 जुलै रोजी काँग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता तो दिवस आम आदमी पक्षातर्फे गोव्यातील लोकशाहीचा ‘काळा दिवस’ म्हणून पाळला. काँग्रेसी आमदारांच्या या कृत्याचा निषेध म्हणून आप नेत्यांनी भाजप प्रवेश केलेल्या काँग्रेस आमदारांना केक भेट देऊन अनोखी गांधीगिरी केली.
काळ्या चॉकलेटी केकवर भाजपच्या कमळाच्या देठावर पाकळ्यारुपी काँग्रेसी हात असा अनोखा संगम दर्शविणारे चिन्ह उमटविण्यात आले होते. त्याखाली काँग्रेस जनता पार्टी असे नावही लिहिले होते. असा केक आपच्या त्या त्या भागातील कार्यकर्त्यांनी आमदारांच्या घरी जाऊन भेट दिला.
दरम्यान, काही आमदारांनी केक घेऊन आलेल्या आप कार्यकर्त्यांचे हसतमुखाने स्वागत करत खेळीमेळीच्या वातावरणात केकचा स्वीकार करून आस्वादही घेतला. काही आमदारांनी त्यांना आपल्या घराचे दरवाजेच खोलले नाहीत. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांनी ते केक त्यांच्या कार्यालयात कर्मचाऱयांच्या हवाली केले, मात्र नुवेत आमदार विफ्रेड डिसा ऊर्फ बाबाशान व आपच्या उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. सुमारे पाऊण तास हा प्रकार सुरू होता.