कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी 14 कोटी 90 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासकामांना देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
मंजूर कामामध्ये चंदगड तालुक्यातील , चंदगड- इब्राहीमपुर- चितळे-जेऊर -श्रृंगारवाडी – हत्तीवडे – महागांव रस्ता सुधारणेसह आर. सी. सी. गटर्स करण्यासाठी 1 कोटी 80 लाख व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील शेंडापार्क जवळून जाणारा कंदलगांव – कोगील खुर्द इजिमा क्र . 74 रस्त्याचे रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी 2 कोटी 85 लाख इतका निधी मंजूर झालेला आहे. तसेच करवीर तालुक्यातील 1 ) प्रजिमा 41 पासून चक्रेश्वरवाडी – बारडवाडी – ठिकपुर्ली – निगवे खालसा रस्ता डांबरीकरणासाठी 95 लाख , चित्रनगरी ते इजिमा क्र . 74 ला मिळणारा ग्रा.मा. 49 चे रुंदीकरणासह सुधारणेसाठी 1 कोटी 90 लाख , इजिमा क्र . 186 पासून निगवे खालसा ते परिते रा.मा. क्र . 80 डांबरीकरण करण्यासाठी 95 लाख , ग्रा.मा. क्र . 122 ते धनगरवाडा वसाहतीजवळून प्रजिमा 29 ला मिळणारा रस्ता ग्रा मा क्र . 127 रुंदीकरणासह सुधारणा कण्रयासाठी 95 लाख तसेच ग्रा.मा. क्र . 194 पासून भुये राजाराम वेअर रस्ता ग्रा.मा. क्र . 12 चे रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी 95 लाख, सांगरुळ – म्हारुळ , बहीरेश्वर – कोगे ते नरसोबा देवालय ते रा.मा. क्र . 194 रस्त्याचे रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी 95 लाख असा एकूण जिह्यातील 10 रस्त्यांच्या कामांसाठी 14 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे . सदरचा निधी मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.