वृत्तसंस्था/ चेन्नई
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेत शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायजर्स हैदराबादचा 8 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतील चेन्नई संघाचा हा चौथा विजय असून ते स्पर्धेच्या गुणतक्त्यात 8 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहेत. हैदराबादचा संघ 4 गुणासह नवव्या स्थानावर आहे. 22 धावात 3 गडी बाद करणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी 135 धावांचे आव्हान दिले. हैदराबाद संघाने 20 षटकात 7 बाद 134 धावा जमविल्या. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने 18.4 षटकात 3 बाद 138 धावा जमवित विजय नोंदविला.
चेन्नईच्या डावामध्ये सलामीची जोडी ऋतुराज गायकवाड आणि कॉनवे यांनी 11 षटकात 87 धावांची भागीदारी करीत विजय सोपा केला. एकेरी धाव घेण्याच्या नादात गायकवाड धावचीत झाला. त्याने 30 चेंडूत 2 चौकारांसह 35 धावा जमविल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेला अजिंक्य रहाणे मार्कंडेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 9 धावा जमविल्या. नंतर मार्कंडेनेच चेन्नईच्या अंबाती रायुडूला 17 व्या षटकात त्रिफळाचीत केले. त्याने 1 चौकारासह 9 धावा जमविल्या. कॉनवे आणि मोईन अली यांनी विजयाचे सोपस्कार 19 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर पूर्ण केले. कॉनवेने 57 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह नाबाद 77 तर मोईन अलीने 6 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 6 धावा जमविल्या. चेन्नईला केवळ 2 अवांतर धावा मिळाल्या. त्यांच्या डावामध्ये 1 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. हैदराबाद संघातर्फे मयांक मार्कंडेने 23 धावात 2 गडी बाद केले.
जडेजाचा भेदक मारा
तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबाद संघाला प्रथम फलंदाजी दिली. हॅरी ब्रूक आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने 26 चेंडूत 35 धावांची भागीदारी केल्यानंतर आकाश सिंगने ब्रूकला झेलबाद करीत ही जोडी फोडली. त्याने 13 चेंडूत 3 चौकारांसह 18 धावा जमविल्या. ब्रूक बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 30 चेंडूत 26 धावांची भर घातली. रवींद्र जडेजाने अभिषेक शर्माला रहाणेकरवी झेलबाद केले. त्याने 26 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह सर्वाधिक 34 धावा जमविल्या. जडेजाने हैदराबादला आणखी एक धक्का देताना त्रिपाठीला झेलबाद केले. त्याने 21 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. लंकेच्या महेश थीक्षणाने कर्णधार मार्करमला धोनीकरवी झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. क्लासेनने 16 चेंडूत 1 चौकारासह 17 तर अगरवालने 2 धावा जमविल्या. मार्को जान्सेनने 22 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 17 धावा जमविल्या. वॉशिंग्टन सुंदर डावातील शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला. त्याने 1 चौकारासह 9 धावा जमविल्या. हैदराबादला अवांतराच्या रुपात 4 धावा मिळाल्या. हैदराबादच्या डावात 2 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. चेन्नईतर्फे रवींद्र जडेजाने 22 धावात 3 तर आकाश सिंग, थीक्षणा आणि पथिराना यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – सनरायजर्स हैदराबाद : 20 षटकात 7 बाद 134 (ब्रूक 18, अभिषेक शर्मा 34, त्रिपाठी 21, मार्करम 12, क्लासेन 17, अगरवाल 2, जान्सेन नाबाद 17, वॉशिंग्टन सुंदर 9, अवांतर 4, रवींद्र जडेजा 3-22, आकाश सिंग 1-17, थीक्षणा 1-27, पथिराना 1-22).
चेन्नई सुपर किंग्ज : 18.4 षटकात 3 बाद 138 (गायकवाड 35, कॉन्वे नाबाद 77, रहाणे 9, रायडू 9, मोईन अली नाबाद 6, अवांतर 2, मयांक मार्कंडे 2-23).