ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाण्यात ‘हर हर महादेव’ चित्रपट बंड पाडल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर शुक्रवारी (११ नोव्हेंबर) राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह ११ ते १२ जणांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. यांनतर आज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. यांनतर न्यायालयाने आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर न्यायालयाने 1 तास निकाल राखून ठेवला आहे. जितेंद्र आव्हाड यांना ठाणे नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. (14 days judicial custody to jitendra awhad)
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळणार की तुरुंगात जावं लागणार यावर आज (१२ नोव्हेंबर) न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निकाल सुनावणीआधी वेळ घेतला आहे. थोड्याच वेळात यावर निकाल देण्यात आला. यावेळी न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर थोड्याच वेळात आव्हाड यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यावेळी ठाणे न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. न्यायालय परिसरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमू नये याचीही दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जमून घोषणाबाजीही केली.
हे ही वाचा : ब्लू टिकच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय ट्विटरकडून रद्द
विवियाना मॉलमध्ये वाद पेटला!
सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी यावरून ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये मोठा वाद निर्माण झाला. ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो विवियाना मॉलमधील थिएटरमध्ये सुरू असताना रात्री १० च्या सुमारास गदारोळ झाला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना मारहाण करून त्यांना बाहेर काढल्याचा आरोप मनसेनं केला. तर वाद घालणाऱ्या प्रेक्षकानं मद्यप्राशन केल्याचा दावा जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे शो सुरू असतानाच विवियाना मॉलमध्ये मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी खडाजंगी सुरू असल्याचं पाहायला मिळालं.
या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून काही प्रेक्षकांना मारहाण झाल्याचाही आरोप झाला. मनसेकडून याविरोधात पोलिसांत दाद मागण्यात आली. यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासह काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी शो बंद पाडून चित्रपटगृहात बसलेल्या प्रेक्षकांना हुसकावून लावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. तसेच, बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांनी तिकिटाचे पैसे परत मागितल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.